स्लॅबला तडे, पिलरच्या सळ्याही गंजल्या
। रोहा । वार्ताहर ।
दहा वर्षांपूर्वी रोहेकरांच्या सेवेत दाखल झालेली नगरपालिकेची इमारत अल्पावधीतच खिळखिळी झाली आहे. निकृष्ट बांधकामामुळे स्लॅबला तडे गेले आहेत, तर ठिकठिकाणी गळती लागली आहे. अनेक पिलरचे प्लॅस्टर निखळून गंजलेल्या सळ्या बाहेर आल्या आहेत. मात्र इतकी भयंकर परिस्थिती होऊनही प्रशासन ढिम्म असल्याने कर्मचाऱ्यांसह विविध कामांसाठी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागत आहेत. दुसरीकडे रोहा शहरात कोट्यावधी खर्च करून विकास झाला तो कसा झाला याचा प्रत्यय या इमारतीला पडलेले तडे पाहून नागरिकांना येत असल्याची चर्चा आहे.
2006 मध्ये पायाभरणी केलेल्या नगर परिषद इमारतीचे बांधकाम 2009 मध्ये पूर्ण झाले होते. दोन कोटी 30 लाख रुपये यासाठी खर्च करण्यात आले होते. परंतु टुकार आणि दर्जाहीन कामामुळे या इमारतीला तडे गेले आहेत. केवळ 13 वर्षे पूर्ण झालेल्या या इमारतीमध्ये नगरपालिका प्रशासकीय कार्यालय, महावितरणचे विभागीय कार्यालय आणि 19 व्यापारी गाळ्यांचे संकुल उभे आहे. परंतु आता या इमारतीला भेगा पडल्या असल्याने भीतीचे वातावरण आहे. आरसीसी कामाची स्थिती दयनीय असल्याने कर्मचारी काम करायला घाबरत आहेत. इमारतींच्या स्लॅबवर मोठमोठी झाडे उगवली आहेत. इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट व्हावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मात्र याची सखोल चौकशी करून शास्त्रीय पद्धतीने दुरुस्ती करणे आवश्यक असताना पडलेल्या काँक्रीटवर साध्या सिमेंटचा गिलावा करून वेळ मारून नेली जात असल्याने संताप व्यक्त होत आहे.
पालिका अभियंता यांच्याकडूज आपण याविषयी माहिती घेतली, इमारतीच्या काही भागाचे प्लास्टर निघालेले आहे, लवकरच ते काम करून घेण्यात येईल.
पंकज भुसे, प्रभारी मुख्याधिकारी, रोहा नगर परिषद
रोहयाला पूर्ण वेळ मुख्याधिकारी नसल्याने अधिकाऱ्यांवर कुणाचाही अंकुश राहिलेला नाही. प्रशासन विकासकांना परवानग्या देण्यात व्यस्त आहे. शास्त्रीय पद्धतीने डागडुजी करण्यासाठी मान्यताप्राप्त संस्थेकडून लवकरात लवकर या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट होणे गरजेचे आहे.
समीर शेडगे, तालुकाप्रमुख शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)