नागाव ग्रामपंचायत जिल्ह्यात ठरली पहिली
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
सागरी किनाऱ्यांवरील वाढत्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी रायगड जिल्ह्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला असून, अलिबाग तालुक्यातील नागाव ग्रामपंचायतीला रोबो रक्षक व सुरक्षा किट देण्यात आले आहे. असा उपक्रम राबविणारी नागाव ही जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.
रायगड जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने राज्यातील एक महत्त्वाचा जिल्हा मानला जातो. सुमारे 240 किलोमीटरचा विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभलेल्या या जिल्ह्यात अलिबाग, नागाव, आक्षी, काशीद, मुरूड, मांडवा, श्रीवर्धन, दिवेआगर या किनाऱ्यांवर दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होत असते. मात्र, वाढत्या पर्यटक संख्येसोबतच सुरक्षेचा प्रश्नही अधिक गंभीर बनत चालला आहे.
भरतीच्या वेळी खोल समुद्रात जाऊ नये, अशा सूचना देऊनही अनेक अतिउत्साही पर्यटक त्या नियमांकडे दुर्लक्ष करतात. परिणामी, दरवर्षी बुडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून, काहींना आपला जीवही गमवावा लागतो. या पार्श्वभूमीवर सागरी सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने अत्याधुनिक उपाययोजना हाती घेतली आहे.
अलिबाग तालुक्यातील नागाव ग्रामपंचायतीला रोबो रक्षक व सुरक्षा किट प्रदान करण्यात आले असून, या उपकरणांचे प्रात्यक्षिक पोलीस मुख्यालयाच्या सभागृहात तसेच अलिबाग समुद्रकिनारी सादर करण्यात आले. या प्रात्यक्षिकामध्ये नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर, ग्रामपंचायत कर्मचारी अशुंमन मानकर, मनिष म्हात्रे, कल्पेश तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.
हा रोबो रक्षक समुद्रात बुडणाऱ्या व्यक्तीपर्यंत अत्यंत वेगाने पोहोचू शकतो. रिमोटच्या साहाय्याने नियंत्रित होणारा हा रोबो 800 मीटरपेक्षा अधिक अंतर सहज पार करू शकतो. त्यामुळे किनाऱ्यांवरील मानवी जीव रक्षकांना स्वतःचा जीव धोक्यात घालून खोल समुद्रात जाण्याची गरज कमी होणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत हा रोबो जीव वाचविण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. नागावसह काशीद आणि श्रीवर्धन किनाऱ्यांवरही अशा प्रकारचे रोबो रक्षक तैनात करण्याचा विचार असून, त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेत मोठी भर पडणार आहे.
सागरी सुरक्षेसाठी तंत्रज्ञानाचा हा नवा प्रयोग यशस्वी ठरल्यास रायगडमधील इतर किनाऱ्यांवरही अशा प्रकारचे रोबो रक्षक तैनात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
रोबो रक्षकाची वैशिष्ट्ये
* रिमोटद्वारे नियंत्रित अत्याधुनिक उपकरण
* 800 मीटरपेक्षा अधिक अंतर कापण्याची क्षमता
* बुडणाऱ्या व्यक्तीपर्यंत जलद पोहोचणार
* जीव रक्षकांचा धोका कमी
* आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत
नागावसारख्या पर्यटनस्थळी पर्यटकांची संख्या मोठी असते. अशा वेळी रोबो रक्षक ही अत्यंत उपयुक्त संकल्पना आहे. मात्र, हे उपकरण प्रभावीपणे वापरण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ आणि त्यांच्या वेतनाबाबत शासनाने योग्य ती तरतूद करावी.
– हर्षदा मयेकर, सरपंच, नागाव ग्रामपंचायत
