| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड पोलीस दलातील 173 पोलीस अंमलदारांना सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यात आली आहे. नुकताच त्यांना पदभार सोपविण्यात आला. आता या पोलिसांना वाढीव वेतनाची प्रतिक्षा लागून राहिली आहे. हे वेतन कधीपासून देणार याकडे आता या कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
पोलीस दलात सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार रायगड पोलीस अस्थापनेवरील सुधारित आकृतीबंधानुसार अधीक्षक कार्यालयामार्फत पदोन्नती जारी करण्यात आली. जिल्ह्यातील 27 पोलीस हवालदारांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, 144 पोलीस नाईक, पोलीस शिपाई यांना पोलीस हवालदार, व दोन चालक पोलीस हवालदार यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चालक म्हणून पदोन्नती देण्यात आली. जिल्ह्यातील 173 अंमलदारांची पदोन्नती करण्यात आली .या पदोन्नतीचे आदेश 27 ऑक्टोबर रोजी देण्यात आले. त्यानुसार प्रत्येक पोलीस ठाण्यात त्याची अंमलबजावणी झाली. आता मात्र या पदोन्नती झालेल्या पोलीसांना वाढीव वेतनाची प्रतिक्षा लागून राहिली आहे. या महिन्यापासून वाढीव वेतन मिळण्याची आशा होती. परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे कधीपर्यंत वाढीव वेतन मिळणार याकडे पोलिसांचे लक्ष लागून राहिले आहे.
आमची पदोन्नती झाली आहे. मात्र वाढीव वेतन अजूनपर्यंत मिळाले नाही. त्यामुळे आम्हाला वाढीव वेतनाची प्रतिक्षा लागून राहिली आहे.
पोलीस कर्मचारी, नाव न घेता सांगण्याच्या अटीवरून