राष्ट्रीय स्पर्धेत 48 पदके, शिवछत्रपती पुरस्कार विजेता
| भंडारा | वृत्तसंस्था |
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मिळवणाऱ्या खेळाडूंचे कौतूक होत असते. काही दिवस बातम्या येत असतात. परंतु या खेळाडूंनी दाखवलेली जिद्द आणि चिकाटीची दखल राज्य शासनाकडून घेतली जात नाही, असे प्रकार समोर येत असतात. 18 सुवर्ण, 16 रौप्य आणि 14 कास्य पदके असे एकूण 48 पदके मिळवणाऱ्या खेळाडूवर ऑटोरिक्षा चालवण्याची वेळ आली आहे. उच्च शिक्षण झालेल्या आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गाजवणाऱ्या दिव्यांग योगेश घाटबांधे उदरनिर्वाहासाठी ऑटो रिक्षा चालवत आहे.
जिद्द सोडली नाही
भंडारा लाखनी तालुक्यातील किटाडी बाजार येथील दिव्यांग योगेश रवींद्र घाटबांधे हा खेळाडून विविध स्पर्धांमध्ये पदकांची लूट केली आहे. अडीच हजार लोकवस्तीच्या किटाडी या छोट्या गावातील योगेश याला लहानपणीच पोलिओमुळे अपंगत्व आलं. पंरतु विपरीत परिस्थितीवर मात करीत त्याने खेळण्याची जिद्द सोडली नाही. विविध क्रीडा प्रकाराची त्यांनी तयारी सुरु केली. योगेश्वर यांनी आतापर्यंत 48 पदक पटकाविली असून त्यात 18 सुवर्ण, 16 रोप्य आणि 14 कास्य पदकांचा समावेश आहे. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अपंगाच्या 14 व्या वरिष्ठ आणि 8व्या कनिष्ठ गटाच्या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत त्याने एफ 56 गटात भालाफेक, थालीफेक आणि गोळाफेक मध्ये कांस्य पदक पटकाविले.
शिवछत्रपती पुरस्कार मिळाला
जिद्द, चिकाटीच्या बळावर राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेत एक दोन नव्हे तर तब्बल 48 पदक पटकाविली. भालाफेक, थाळीफेक आणि गोळाफेक स्पर्धेत आपल्या गावाचे नाव सुवर्णाक्षरात कोरले. राज्य सरकारने यंदा त्याचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देवून गौरव केला. मात्र, घरप्रपंच चालविण्यासाठी त्यांच्यावर आता ऑटोरिक्षा चालविण्याची वेळ आलेली आहे.
महाराष्ट्राचे कर्णधारपद भूषवले
कोल्हापुरच्या राज्यस्तरीय अपंग स्पर्धेत एक सुवर्ण आणि दोन रजत पदके पटकावून त्याने जिल्ह्याची मान उंचाविली. योगेश्वर चार आंतरराष्ट्रीय, सहा राष्ट्रीय 16 राज्यस्तरीय स्पर्धेत तो आतापर्यंत सहभागी झाला आहे. बंगळुरु, चंदीगढ, गजीयाबाद येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत तो सहभागी झाला होता. उत्तर प्रदेशातील पॅराॲथेलेटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत त्याने महाराष्ट्राचे कर्णधारपद भुषविले. दिव्यांगत्वावर मात करुन त्याने खेळात यश मिळवले. परंतु या यशानंतर त्याला नोकरी मिळत नाही. त्यामुळे रिक्षा चालवत कुटुंब सांभाळावे लागत आहे.