प्रशासनाच्या ढिसाळ, नियोजनशून्य कारभाराचा भाविकांना फटका, तिकिटापेक्षा ज्यादा रकमेच्या वसुलीमुळे भाविक संतप्त
| चिरनेर | प्रतिनिधी |
महाशिवरात्री निमित्ताने घारापुरी बेटावर ये-जा करणाऱ्या हजारो शिवभक्तांना प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका बसला आहे. संध्याकाळी 4 नंतर तर काही बोटी उरण-मोरा बंदरातच चिखलात रुतून बसल्यामुळे आणि ठरवून दिलेल्या एकेरी 65 रुपये तिकिटा ऐवजी बोट चालकांकडून 70-80 वसूल केल्याने घारापुरी बेटावर येणाऱ्या भाविकांची संख्या यावर्षीही आणखीनच कमी झाली आहे. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे मात्र हजारो शिवभक्तांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
दरवर्षी घारापुरी बेटावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी बोटींच्या एकेरीच्या तिकिट दरात वाढ केली जात असल्याने बेटावर येणाऱ्या भाविकांची संख्याही कमी होत चालली आहे. याबाबत खंत आणि चिंता व्यक्त करून भाविकांना कमी खर्चात दर्शन घडविण्यासाठी यावर्षी तिकीट दर कमी करण्याची विनंती घारापुरी ग्रामपंचायतीचे सरपंच मीना भोईर, उपसरपंच बळीराम ठाकूर यांनी प्रादेशिक बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली होती.
ग्रामपंचायतीच्या पत्रानंतर महाशिवरात्रीला बेटावर येणाऱ्या भाविकांसाठी बंदर विभागाकडून तिकिट दरात कोणत्याही प्रकारची वाढ न करता यावर्षीही सुमारे 300 ते 500 प्रवासी वाहतूक क्षमतेच्या सहा मच्छिमार बोटींची व्यवस्था केली होती. यासाठी बंदर विभागाने एकेरीसाठी 65, तर दुहेरी परतीच्या प्रवासासाठी 130 असा तिकीट दर ठरवून दिला होता. मात्र, तिकीट दर ठरवून दिल्यानंतरही बोट चालकांकडून एकेरीसाठी 70-80 तर परतीच्या प्रवासासाठी 140-160 रुपयांपर्यंत मनमानीपणे तिकीट दर आकारणी करीत होते. त्याशिवाय तिकीटही दिले जात नव्हते. बोटचालकांच्या मनमानी तिकीट दर वसुलीमुळे मात्र महाशिवरात्री निमित्ताने बेटावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या यावर्षीही मोठ्या प्रमाणावर कमी झाली असल्याचे दिसून येत आहे. तिकीट दर ठरवून दिल्यानंतरही बोटचालक बंदर, पोलीस व इतर शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांच्या पैसे द्यावे लागणार असल्याचे सांगत मनमानीपणे पैसे वसूल करीत होते. मात्र, बोट चालकांचा मनमानी कारभार आणि त्यांना लगाम घालण्यात अपयशी ठरलेल्या विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांबद्दल भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.







