हजारो नागरिक तहानलेले; पाण्यासाठी वीस दिवसांची प्रतीक्षा
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
पावसामुळे अनेक धरणे पाण्याने भरली आहेत. मात्र, धरणे भरूनही भरपावसात न्हावे गावात पाणीकपातीचे संकट उभे राहिले आहे. सात हजारांहून अधिक नागरिकांना पाण्यासाठी वीस दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे भीषण संकट ओढावले आहे. या परिस्थितीत डेंग्यूसारख्या संसर्गजन्य आजारांचा धोका वाढल्याचा आरोप ग्रामसुधारक मंडळ न्हावेचे माजी अध्यक्ष योगेश कुंडलिक पाटील यांनी केला आहे. याकडे ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
पनवेल शहराचा विस्तार होत असताना ग्रामीण भाग अजूनही असुविधांपासून वंचित असल्याचा प्रकार समोर आला आहे. पनवेल तालुक्यातील न्हावे गावात गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. त्याचे गंभीर परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जीवनासह सार्वजनिक आरोग्यावरही होऊ लागले आहेत. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. वीस दिवस आड फक्त अर्धा तास पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे घराघरांत मोठ्या प्रमाणावर पाणी साठवले जात आहे. त्याचा परिणाम मानवी आरोग्यवर होऊ लागला आहे. डेंग्यूसदृश्य परिस्थिती गावांमध्ये निर्माण झाली आहे. आतापर्यंत 70 हून अधिक डेंग्यूचे संशयित रुग्ण म्हणून आढळून आल्याचा आरोप ग्रामसुधारक मंडळ न्हावेचे माजी अध्यक्ष योगेश कुंडलिक पाटील यांनी केला आहे.
योगेश पाटील यांच्या म्हणण्यानुसार, या गावाची लोकसंख्या साधारण आठ हजार आहे. स्थानिकांसह भाडेकरूंचीही संख्या प्रचंड आहे. अनियमित पाणीपुरवठा केला जात आहे. गावातील पाणीपुरवठा व्यवस्था गेल्या गेल्या काही महिन्यांपासून विस्कळीत झाली आहे. त्यामुळे महिलांसह ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्यांची मोठी गैरसोय होत आहे. वीस दिवस उशिरा येणाऱ्या पाण्यामुळे पुढील अनेक दिवस पुरेल इतके पाणी प्लास्टीक ड्रममध्ये साठवून ठेवण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. पंधरा ते वीस दिवसाच्या पाणीकपातीचे संकट गावाला भेडसावत असताना भरलेल्या पाण्यामुळे डेंग्यूचाही धोका निर्माण झाला आहे. याकडे ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे पाटील यांच्याकडून सांगण्यात आले आहे. केवळ पिण्याच्या पाण्यापुरता मर्यादित न राहता सार्वजनिक आरोग्याशी संबंधित गंभीर विषय बनल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
अनधिकृत नळजोडणीकडे दुर्लक्ष
हेटवणे आणि रानसई या धरणांमधून या गावांना पाणीपुरवठा केला जातो. गावातील मुख्य जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र, गावातील मुख्य जलवाहिनीला अनधिकृतपणे नळजोडणी करण्यात आली आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम होत असल्याचा आरोप योगेश पाटील यांच्याकडून करण्यात आला आहे. तक्रारीनंतर काही दिवसांपूर्वी अशा अनधिकृत जोडण्या तोडण्यात आल्या होत्या. मात्र, त्या पुन्हा सुरू झाल्याचे निदर्शनास येत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकारामुळे अधिकृत ग्राहकांपर्यंत आवश्यक प्रमाणात पाणी पोहोचत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याबाबत ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी शेंडगे यांच्याशी संपर्क साधला, मात्र होऊ शकला नाही.







