सहा जणांविरुद्ध गुन्हा; 6 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त
| नागोठणे | प्रतिनिधी |
नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंद्यांविरोधातील कारवाईला वेग आला असून, त्याच मोहिमेंतर्गत नागोठणे मोहल्ला परिसरातील एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकत सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत जुगारासाठी वापरलेले साहित्य आणि रोख रकमेसह एकूण 6 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
प्रभारी अधिकारी रवींद्र पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलिसांनी 22 जुलै रोजी रात्री 8.35 वाजण्याच्या सुमारास मोहल्ला परिसरातील समीर पानसरे यांच्या दोन मजली चाळीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत समीर पानसरे (51), मोहम्मद सैय्यद (73), इरशाद इलानी (39), इमान मुल्ला (39), मुजफर कडवेकर (42) आणि सादिक सिंधी (41) या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सर्व आरोपी नागोठणे मोहल्ला येथील रहिवासी आहेत.
पोलिसांनी जुगाराच्या गेम फी म्हणून जमा केलेले प्रत्येकी 300 रुपये, असे एकूण 1 हजार 800 रुपये तसेच आरोपींच्या अंगझडतीत सापडलेले 4 हजार 400 रुपये, जुगारासाठी वापरलेला कागद आणि बॉलपेन असा एकूण 6 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस शिपाई बळी पुट्टेवाड यांच्या फिर्यादीवरून नागोठणे पोलीस ठाण्यात सहाही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, नागोठणे परिसरातील गावठी दारू, गुटखा आणि इतर अवैध व्यवसायांविरोधातही पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू ठेवला असून, या धाडसत्रामुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.







