| चिरनेर | प्रतिनिधी |
राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातून कृतीशील समाज शिक्षणाचे धडे मिळतात, असे प्रतिपादन उरणच्या नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी केले. रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कॉलेज फुंडे महालण विभागातील एन.एस.एस. आयोजित विशेष निवासी शिबिराचा समारोप बोकडविरा येथे पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
दि.13 ते 19 जानेवारी या सात दिवसीय शिबिरात विद्यार्थ्यांनी सामाजिक सेवा, नेतृत्व विकास आणि पर्यावरण जागृतीसह विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. तसेच ग्रामसेवा, आरोग्य जागृती, वृक्षारोपण, सांस्कृतिक कार्यक्रम आणि नेतृत्व कार्यशाळा इत्यादी उपक्रमांचा समावेश शिबिरात दिसून आला. या शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची भावना जोपासली असून, त्यांच्यातील छुप्या क्षमतांना दिशा मिळाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य डॉ. आमोद ठक्कर होते.
यावेळी आमोद ठक्कर यांनी, एनएसएस सारख्या उपक्रमामुळे तरुण पिढी सामाजिक बदलांचे दूत बनते. विद्यार्थी जीवनात आशा शिबिरांची गरज प्रतिपादित केली हे एक मोठे काम आहे, असे स्पष्ट केले. तसेच, सरपंच अपर्णा पाटील, यशवंत ठाकूर व सूर्यकांत पाटील यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिबिराचे अहवालवाचन प्रा. बळीराम पवार यांनी केले. शिबिरातील काही सहभागी स्वयंसेवेकांनी आपली यथोचित मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाच्या शेवटी एनएसएस प्रमुख प्रा. राम गोसावी यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रा. योगेश कुलकर्णी यांनी केले. यावेळी ध्रुव पाटील, किशोर नलावडे यांच्यासह ग्रामस्थ व कार्यक्रम अधिकारी डॉ. रत्नमाला जावळे उपस्थित होत्या. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी सरपंच अपर्णा पाटील, उपसरपंच ध्रुव पाटील, ग्राम सुधार मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत पाटील, सचिव श्रीकांत पाटील, सल्लागार यशवंत ठाकूर, मयुरेश पाटील यांचे विशेष मोलाचे सहकार्य लाभले.
एनएसएस शिबिरातून शिक्षणाचे धडे मिळतात : भावना घाणेकर
