गेल कंपनीचा स्तुत्य उपक्रम
। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील उसर येथील गेल कंपनीमार्फत परिसरात वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. त्यामध्ये बेलोशी येथील को.ए.सो. लोकनेते अॅड. दत्ता पाटील हायस्कूलमधील शाळकरी मुलींसाठी मोफत स्वरक्षणाचे धडे देण्याचा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. स्वयंसिद्धा प्रशिक्षण शिबिरातून मुलींना कराटे प्रशिक्षण देण्यात आले. आंतरराष्ट्रीय खेळाडू तपस्वी गोंधळी यांच्या मार्फत पाच दिवस धडे देण्यात आले आहेत. या शिबिराचे आयोजन गेल कंपनीतील मुख्य महाप्रबंधक अनुप गुप्ता, महाप्रबंधक जितीन सक्सेना व शितल लाकरा यांच्या मार्गदर्शनातून करण्यात आले आहेत. यावेळी, शिबिराचे उद्घाटन मुख्याध्यापक संतोष बोंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना वाढू लागल्या आहेत. संकटकाळी स्वतःचे रक्षण करण्याचे बळ मुलींना मिळाले पाहिजे हा उद्देश समोर ठेवून उसर येथील गेल कंपनीमार्फत बेलोशी येथील हायस्कूलमधील विद्यार्थीनींसाठी पाच दिवस स्वरक्षणाचे धडे देण्याचे शिबीर सुरु करण्यात आले आहे. या कालावधीत मुलींना कराटेचे धडे देऊन त्यांना सक्षम बनविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या शिबिराला विद्यार्थीनींकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असून कराटेचे धडे घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी संतोष बोंद्रे यांनी शिबिरात सहभागी झालेल्या मुलींना शुभेच्छा देत स्वसंरक्षणाचे महत्त्व सांगितले. ते म्हणाले की, प्रत्येक वेळी हाताला राखी बांधणारा भाऊ आपल्या मदतीसाठी येईलच असे नाही, त्याकरिता आपण नेहमी सक्षम असणे गरजेचे आहे. गेल इंडिया लिमिटेड उसर यांच्यावतीने आयोजित स्वसंरक्षण प्रशिक्षणामुळे मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल, असे सांगत त्यांनी आंतरराष्ट्रीय खेळाडू तपस्वी गोंधळी यांच्या कार्याची माहिती दिली.
यावेळी प्रिझम संस्थेच्या अध्यक्षा तपस्वी गोंधळी, सहाय्यक शिक्षक रवींद्र शिंदे, मुकेश कोळी, सचिन कांबळे, काशिनाथ मुंबईकर, श्रीनिवास साळसकर, नितीन गावित, सहाय्यक शिक्षिका कल्पना कोळी, दिपाली शेळके, नीता म्हात्रे, श्रेया चेरकर, प्रशिक्षिका प्रणाली तळेगावकर, मनीषा माने, दिव्या शिंदे, निकी बेंडे व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.