रेवदंड्यात मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर
। अलिबाग । प्रतिनिधी ।
रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गरोदर ठेवल्याचा प्रकार घडला. या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा प्रकारच्या घटना वाढत असल्याने महिला, मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पीडित अल्पवयीन मुलीशी मैत्री करून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन केलेल्या प्रकारामुळे ती मुलगी गरोदर राहिली. याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीशी केलेल्या या कृत्याबाबत परिसरात खळबळ उडाली आहे. मागील काही दिवसांपूर्वी कोर्लई परिसरातील एका मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार घडला होता. ही घटना घडून अनेक दिवस उलटून गेले. त्यानंतर पुन्हा अशाच प्रकारची घटना घडल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रेवदंडा पोलिसांचा असे कृत्य करणार्यांवर धाक राहिला नसल्याची चर्चा जोरात सुरु आहे. मागील वर्षभरासून जिल्ह्यातील अनेक भागात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. परंतु, त्यावर अंकुश ठेवण्यास पोलीस अपयशी ठरल्याची प्रतिक्रिया जनमानसातून उमटत आहे.