रायगडच्या राज मोरेची निवड
। मुंबई । प्रतिनिधी ।
भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या मान्यतेने व उत्तर प्रदेश राज्य कबड्डी असो.च्या विद्यमाने होणार्या 50व्या कुमार/कुमारी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरीता महाराष्ट्राने दोन्ही संघ जाहीर केले आहेत. या स्पर्धेत पुणे ग्रामीणचे वैभवी जाधव व अनुज गावडे या दोन्ही खेळाडूंकडे अनुक्रमे कुमारी व कुमार गटाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. तसेच, कुमार गटात रायगड जिल्ह्यातील राज मोरेचा देखील समावेेश झाला आहे. नुकतेच सांगली येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेतून हे संघ निवडण्यात आले आहेत.
सांगली येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत रोहा येथील राज ज्ञानेश्वर मोरे याने रागडचे नेतृत्व स्विकारले होते. रायगडचा कर्णधार म्हणून कामगिरी बजावत असताना राजने उत्कृष्ठ चढाईतून पाचवेळा संघ निवडून देण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे. तसेच, राज मोरे हा जय बजरंग रोहा कुमार गट कबड्डी संघाचा अष्टपैलू खेळाडू म्हणून कामगिरी बजावत आहे. त्याची महाराष्ट्राच्या कुमार गटात निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
ही राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा दि. 8 ते 11 जानेवारी या कालावधीत उत्तर प्रदेशातील हरिद्वार येथील रोशनबाद बंदिस्त क्रीडा संकुल येथे खेळविण्यात येणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्राचे निवडलेले हे दोन्ही संघ सोमवारी (दि.6) पहाटे स्पर्धेकरीता रवाना झाले असून राज्य कबड्डी असो.चे सचिव बाबुराव चांदेरे यांनी हे संघ जाहीर केले आहेत.
कुमारी गट:- वैभवी जाधव (संघनायिका), साक्षी रावडे, प्रतिक्षा लांडगे, सृष्टी मोरे (सर्व पुणे ग्रामीण), साक्षी गायकवाड, रेखा राठोड, भूमिका गोरे (सर्व पिंपरी चिंचवड), श्रेया गावंड (ठाणे), वैष्णवी काळे (अहमदनगर), मोनिका पवार (जालना), आरती चव्हाण (परभणी), कादंबरी पेडणेकर (मुंबई शहर पूर्व), प्रशिक्षक- महेंद्र माने, व्यवस्थापिका- निकिता लाड.
कुमार गट:- अनुज गावडे (संघनायक), महेश मोने, जयंत काळे (सर्व पुणे ग्रामीण), आफताब मंसुरे, रोहन तुपारे, आदित्य पिलाणे (सर्व ठाणे शहर), विजय तारे (परभणी), समर्थ देशमुख (कोल्हापूर), असीम शेख (नंदुरबार), आदित्य येसगुडे (सांगली), ओम् कुदळे (मुंबई उपनगर पश्चिम), राज मोरे (रायगड). प्रशिक्षक- आयुब पठाण, व्यवस्थापक- वैभव पाटील.