। सांगली । वृत्तसंस्था ।
जिल्ह्यातील जत (गरीं) तालुक्यातील उमराणी येथे आईसोबत कपडे धुण्यासाठी गेलेल्या सख्ख्या बहिण भावाचा पाझर तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. सावित्री बाबुराव यादव (वय 13) व अभिजीत बाबुराव यादव (वय 11) अशी पाण्यात बुडून अंत झालेल्या बहिण भावाचे नाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, उमराणी-सिदूर रस्त्यावरील यादव वस्तीनजीक कुराण पाझर तलाव आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले असल्याने परिसरातील नागरिक या ठिकाणी कपडे धुण्यासाठी, जनावरांना पाणी पाजण्यासाठी येतात. रविवारी दुपारी त्या ठिकाणी सावित्री आणि अभिजित हे दोघे आई समवेत कपडे धुण्यासाठी आले होते. त्यावेळी पाण्यात खेळत असताना त्यांचा पाय गाळात रुतला. त्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न केला पण त्यात काही यश आले नाही अखेर दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.