जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा
। अलिबाग । प्रतिनिधी ।
ताडवागळे येथील माजी सदस्य सिद्धेश हंबीर यांच्यासह वडवली येथील असंख्य कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (दि. 27) सायंकाळी पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. शेकापच्या कार्यप्रणालीवर खुश होऊन असंख्य कार्यकर्ते शेकापमध्ये प्रवेश करीत असल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
वडवली येथील श्री हनुमान मंदिरातील सभागृहात सायंकाळी पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. यावेळी रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, ताडवागळे कोलघर येथील ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच शैलेश पाटील, विलास म्हात्रे, माजी सदस्य नारायण पारधी, अनिल पाटील, बाळाराम दांडेकर, नरेश म्हात्रे, गजानन पाटील, अंजली पाटील, माधुरी पाटील, शलाका पाटील, राजेंद्र पाटील, धनाजी शिद, अविनाश हंबीर, मंगेश पाटील, भालचंद्र चव्हाण आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिध्देश हंबीर हे ताडवागळे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आहेत. गेल्या काही वर्षांपासून ते शिंदे गटामध्ये कार्यरत होते. मनमानी कारभाराला कंटाळून हंबीर यांनी शिंदे गटाला रामराम केले. शेकापचे नेते जयंत पाटील यांच्या कार्यप्रणालीवर खुश होऊन रविवारी त्यांनी शेकापमध्ये प्रवेश केला. तसेच वडवली येथील असंख्य कार्यकर्ते, महिला, तरुणांनी शेकापचा लालबावटा हाती घेतला. जयंत पाटील यांच्या हस्ते सर्व कार्यकर्त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.