| ठाणे | प्रतिनिधी |
ओबीसींचा जिल्हा अशी ओळख असलेल्या ठाणे जिल्ह्यातील तिन्ही लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगणार असल्याची चर्चा असतानाच, प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या ओबीसी बहुजन पार्टीने ठाणे लोकसभेच्या रिंगणात उमेदवार उतरविला आहे. धनगर समाजाचे मल्लिकार्जुन पुजारी यांना उमेदवारी देण्यात आली असून यामुळे ही निवडणूक आणखी रंगतदार होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.
ठाणे जिल्ह्यात आगरी, कोळी आणि कुणबी समाजाची संख्या मोठी आहे. यामुळेच ओबीसींचा जिल्हा अशी ठाण्याची ओळख आहे. जिल्ह्यात ठाणे, भिवंडी आणि कल्याण असे तीन लोकसभा मतदारसंघ येतात. या तिन्ही मतदारसंघात आगरी, कोळी आणि कुणबी समाज महत्वाची भूमिका ठरविताना दिसून येतो. यामुळे निवडणूक काळात या तिन्ही समाजाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. आपल्या समाजाच्या उमेदवाराला उमेदवारी मिळावी, यासाठी हे समाज प्रमुख पक्षांकडे आग्रह धरताना दिसून येतात. यंदाच्या निवडणुकीत हे चित्र कायम आहे. ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगणार असल्याची चर्चा असून त्यातच आता प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या ओबीसी बहुजन पार्टीने ठाणे लोकसभेच्या रिंगणात उमेदवार उतरविला आहे.