| उरण | प्रतिनिधी |
रविवारी रात्री उशिरा उरण तालुक्यातील जासई गावात एका युवकावर चार अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. जखमी युवकाचे नाव प्रेमसिंग यादव (30) असे असून, तो हिंदुत्ववादी कार्यकर्ता असल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी जासई महाराष्ट्र धाबा येथे गोवंश हत्याप्रकरणी आक्षेप घेतल्याचा राग मनात ठेवून हल्ला झाला असल्याचे सांगण्यात येतं आहे.
प्राथमिक माहितीनुसार, चार अज्ञात इसम दोन दुचाकींवरून (क्रमांक नसलेल्या) येऊन जासई गावाजवळ दबा धरून बसले होते. प्रेमसिंग यादव हा तरुण रात्री 12 वाजताच्या दरम्यान आपल्या घरी परतत असताना या चार जणांकडून त्याच्यावर हला करण्यात आला. या हल्ल्यात त्याच्या हातावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले असून, तसेच लोखंडी रॉडसारख्या वस्तूने पोटात व डोक्यावरही मारहाण करण्यात आली. प्रेमसिंग याने प्रसंगावधान राखत हातावर वार झेलले व तातडीने घटनास्थळावरून दूर पळून जाऊन स्वतःचा जीव वाचवला. या घटनेनंतर जासई गावातील काही स्थानिक युवकांनी त्याला उरण येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तिथून पुढील उपचारासाठी त्याला वाशी येथे हलवण्यात आले असता त्याच्या हाताला आठ टाके पडले असून, छातीच्या बरगड्यांनाही दुःखापत झाली आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून, हातावर खोल जखमा असल्याचे सांगण्यात आले आहे.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार मागील महाराष्ट्र धाबा येथे गोवंश हत्या केल्याचा आरोप केल्याचा प्रकरणावरून हा हल्ला झाला असावा. आम्ही 324 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. आमची यंत्रणा कामाला लावली आहे. लवकरच हल्लेखोरही पकडले जातील, अशी माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्ष जितेंद्र मिसाळ यांनी दिली.
गोवंश हत्याप्रकरणी आक्षेप; जासई येथे युवकावर हल्ला
