| उरण | प्रतिनिधी |
नेरुळ/बेलापूर ते उरण या लोकल मार्गावरील गव्हाण रेल्वे स्थानकाला गव्हाण जासई नाव न देता स्थानकाच उदघाटन केल्यास जासई ग्रामस्थ आंदोलन करतील असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. सोमवारी सिडको कार्यालयात जाऊन या संदर्भात जासई ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष घरत यांनी 13 जुलै 2023 च्या सिडकोच्या ठरावानुसार नामविस्तार करावा अशी मागणी केली होती. ती पूर्ण न करताच उरण ते नेरुळ/बेलापूर मार्गावरील गव्हाण व तरघर या दोन्ही स्थानकांच्या उद्घाटनाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात येणार आहेत. मात्र, गव्हाण जासई अशी नामविस्तार करण्याची मागणी असतांनाही गव्हाण रेल्वे स्थानकाच्या फलकावर केवळ गव्हाण नाव लिहण्यात आले आहे. त्यामुळे जासई ग्रामस्थांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. या स्थानकासाठी गव्हाण आणि जासई या दोन्ही गावांची जमीन संपादीत करण्यात आली आहे. भूसंपादन होत असताना जासई ग्रामस्थांनी व ग्रामपंचायतीने सिडकोकडे गव्हाण जासई नामकरणाची मागणी केली होती. तसा ठराव करून सिडकोकडून रेल्वे विभागाकडे करण्यात आला होता. मात्र, तरीही नामविस्तार न केल्याने सिडकोला जाब विचारण्यासाठी जासई ग्रामपंचायतीच्या वतीने विचारणा करण्यात आली. यावेळी संतोष घरत, धीरज घरत, आदित्य घरत, विनायक घरत, संतोष कृष्णाजी घरत, अभिषेक घरत आदी उपस्थित होते.






