| गडब | प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील काराव-गडब ग्रामपंचायतीतर्फे नागरीकांसाठी आयुर्वेदिक कांस्य उपचार पध्दत सुरु करण्यात आली आहे. याचे उद्घाटन ग्रामपंचायतीचे सरपंच मानसी पाटील, उपसरपंच सिता पाटील, सदस्य दिनेश म्हात्रे, सदस्या वैशाली म्हात्रे, संध्या म्हात्रे, ग्राम अधिकारी मच्छिंद्र पाटील यांच्या उपस्थित करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतीचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ उपस्थित होते.
या उपचार प्रणालीचा उपयोग शरीरातील हानिकारक घटक, विषद्रव्ये काढून टाकण्यासाठी, शरीरातील पित्ताचे प्रमाण कमी करण्यासाठी, शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत करण्यासाठी होणार आहे. तसेच मधुमेहामुळे पायाच्या संवेदना कमी होऊ नये आणि मोबाईल, कंमप्युटरमुळे येणारा डोळयांचा थकवा दूर करण्यासाठी, डोळ्यांच्या स्नायूंना चालना मिळण्यासाठी, शरीरात वाढलेली अतिरिक्त उष्णता कमी करण्यासाठी, शरीरातील वाताचे प्रमाण कमी करण्यासाठीही याचा उपयोग होईल. तर तळपायाच्या भेगा, पायाची जळजळ अशा समस्या कमी करण्यासाठी, गुडघेदुखी, टाचदुखी, कंबरदुखी, अशा त्रासाचे प्रमाण कमी करण्यासाठी, पायावरील सूज कमी करण्यासाठी आदि उपायासाठी या उपचार प्रणालीचा उपयोग होणार आहे. ग्रामपंचायत हद्दीतील नागरीकांनी या उपचार प्रणालीचा लाभ घ्यावा, असे अवाहन ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आले आहे.





