| कोर्लई | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील एका नामांकित विद्यालयामध्ये अल्पवयीन शाळकरी मुलींसमोर अश्लील कृत्य केल्याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाळेच्या मुख्याध्यापिकेच्या तक्रारीवरून मुरुड पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदविण्यात आला असून, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कल्पेश गोपीनाथ देवगडे हा काळ्या रंगाच्या बुलेटवर मास्क घालून विद्यालयाच्या मागील गेटने बेकायदेशीरपणे आत शिरला. सातवीच्या वर्गात तासिका सुरू असताना त्याने शर्ट वर करून, पँटला हात लावून अश्लील हावभाव करत चार अल्पवयीन मुलींच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. घडलेली घटना मुलींनी तत्काळ शिक्षिकेला सांगितली व त्यानंतर मुख्याध्यापिकेकडे तक्रार करण्यात आली. यानंतर मुरुड पोलीस ठाण्यात आरोपीवर गुन्हा नोंदवला गेला आहे. पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय.शेख पुढील तपास करीत आहेत.







