मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या 5 ते 6 किलोमीटरपर्यंत रांगा; जिल्ह्यातील बसस्थानकांमध्ये मोठी गर्दी
| माणगाव | प्रतिनिधी |
गणेशोत्सवाचा उत्साह आणि पाच दिवसांच्या बाप्पाला निरोप दिल्यानंतर आता कोकणवासियांचा मुंबईकडे परतीचा प्रवास सुरू झाला आहे. रायगड जिल्ह्यातील विविध एसटी स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून, मुंबई आणि पनवेलच्या दिशेनं जाणाऱ्या एसटी बससाठी प्रवाशांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. दुसरीकडे, खासगी वाहनांची संख्याही वाढल्यानं मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
गणेशोत्सवासाठी कोकणात गेलेल्या गणेशभक्तांच्या परतीच्या प्रवासाला वाहतूक कोंडीचं विघ्न आलं आहे. मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावर माणगाव आणि इंदापूर येथे मोठी वाहतूक कोंडी झाली असून, वाहनांच्या 5 ते 6 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. कोंडी फोडण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र दिसून आले.
माणगाव परिसरात वाहनांच्या तब्बल चार ते पाच किलोमीटरपर्यंत लांब रांगा लागल्या असून, माणगाव आणि इंदापूर हे वाहतूक कोंडीचे मुख्य केंद्र ठरत आहेत. ही कोंडी फोडण्यासाठी महामार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, परतीचा प्रवास सुखकर करण्यासाठी पोलिसांकडून वाहतुकीचं नियमन केलं जात आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात आलेल्या गणेशभक्तांनी बाप्पाला निरोप दिल्यानंतर आता मुंबईच्या दिशेनं परतीचा प्रवास सुरू केला आहे. रायगड जिल्ह्यातील एसटी स्थानकांवर सकाळपासूनच प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मुंबई आणि पनवेलकडे जाणाऱ्या एसटी बसेस पकडण्यासाठी प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. खासगी वाहनांसोबतच सर्वसामान्य प्रवाशांची पसंती असलेल्या एसटी बसनं परतीचा प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे स्थानकांवर गर्दीचं नियोजन करण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर उभं ठाकलं आहे.
दरम्यान, खासगी वाहनांची संख्या वाढल्यानं मुंबई-गोवा महामार्गावरही वाहतुकीचा वेग मंदावला आहे. माणगाव परिसरात वाहनांच्या चार ते पाच किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या आहेत. माणगाव आणि इंदापूर परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून, वाहनचालकांना अत्यंत संथ गतीनं प्रवास करावा लागत आहे. गणेशोत्सवानंतर मोठ्या प्रमाणात वाहनं मुंबईच्या दिशेनं रवाना होत असल्यानं महामार्गावर वाहनांचा ताण वाढला आहे. या पार्श्वभूमीवर रायगड पोलिसांकडून महामार्गावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांकडून ठिकठिकाणी वाहतुकीचं नियमन केलं जात आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शक्य असल्यास पर्यायी मार्गाचा वापर करावा, तसेच पोलिसांच्या सूचनांचं पालन करावं, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
