मुंबई-गोवा महामार्गावर रात्री वाहतूक कोंडीचा सामना
| सुधागड-पाली | प्रतिनिधी |
पाच दिवसांच्या गणरायाला निरोप दिल्यानंतर कोकणकर पुन्हा परतीच्या मार्गावर निघाले होते. मात्र, त्यांना मुंबई-गोवा महामार्गावर रात्री वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांचा संताप अनावर झाला.
मुंबई-गोवा महामार्गावर रात्री रोहा तालुक्यातील खांब गावाजवळ, पेण तालुक्यातील जिते गाव आणि पनवेल तालुक्यातील पळस्पे येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. मुंबई-गोवा महामार्गावरील या ठिकाणी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. तसेच रस्त्याचे काम सुरू आहे. दुभाजक व गतिरोधकदेखील आहेत. त्यामुळे वाहतुकीला आणखी अडथळा येतो. गणराय आणि गौरी विसर्जन केल्यानंतर सायंकाळी कोकणकर मुंबईकडे परतीच्या मार्गाला निघाले होते. मात्र, अचानक महामार्गावर वाहने वाढल्यामुळेदेखील महामार्गावर वाहतूक कोंडीचा सामना त्यांना करावा लागला. काही जणांनी पाली-खोपोली मार्गावरून जाणे पसंत केले. अनेकांना बुधवारी सकाळी कामावर जायचे होते. मात्र, वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे त्यांना कामावर पोहोचण्यासदेखील उशीर झाला.
