शासकीय कामात अडथळा

हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांवर गुन्ह

| उरण | वार्ताहर |

तालुक्यातील हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायत मधील 2011-12 साली गैरप्रकार झाल्याची तक्रार दाखल होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने ग्रामपंचायतमध्ये दप्तराची चौकशी करण्यासाठी विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) विनोद मिंडे हे इतर कर्मचार्‍यांना घेऊन गेले असता त्यांना बाहेरून कुलूप लाऊन कोंडून ठेवण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांविरोधात मोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक केली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विस्तार अधिकारी(ग्रामपंचायत) विनोद मिंडे हे 2011-12 सालामध्ये झालेल्या गैरप्रकरणाची चौकशी करण्यासाठी दि. 25 एप्रिल 2023 रोजी हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायत कार्यालयात गेले होते. यावेळी ग्रामस्थांनी कार्यालयात येऊन वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी ग्रामविस्तार अधिकारी विनोद मिंडे व ग्रामसेविका सुप्रिया घरत व कर्मचार्‍यांना बाहेरून दरवाज्याला कुलूप लावून अडकवून ठेवण्याचा प्रयत्न केला होता.

याप्रकरणी विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) विनोद मिंडे यांनी शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी मोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी नितीन महादेव कोळी, मंगेश अनंत कोळी, वनिता शरद कोळी व उज्वला रमेश कोळी यांच्या विरोधात भादवी कलम 353, 341 व 34 प्रमाणे मोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजित मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धुमाळ हे अधिक तपास करीत आहेत. याप्रकरणी अद्याप कोणा ही आरोपीस अटक केली नसल्याचे पोलीस सूत्रानी सांगितले.

Exit mobile version