गोखले महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांची अडवणूक

पूर्ण फी भरा मगच रिझल्ट घेऊन जा
। श्रीवर्धन । प्रतिनिधी ।
श्रीवर्धन मधील गोखले एज्युकेशन सोसायटीचे वाणिज्य व विज्ञान शाखेचे कनिष्ठ महाविद्यालय आहे. तसेच कला, वाणिज्य व विज्ञान शाखेचे महाविद्यालय आहे. 2020 सालच्या मार्च महिन्यामध्ये संपूर्ण भारत देशामध्ये कोरोना महामारीचा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे देशातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली.

या वेळी दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या अनेक विद्यार्थ्यांनी अकरावीच्या वाणिज्य व विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतला होता. मात्र कनिष्ठ महाविद्यालय बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लासेस महाविद्यालयाकडून सुरू करण्यात आले होते. परंतु अनेक वेळा नेटवर्क नसल्यामुळे किंवा ऑनलाइन लेक्चर घेणारा प्राध्यापक नेटवर्क नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण पाहिजे त्या प्रमाणात होत नव्हते. त्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागल्यानंतर कॉलेजचे नियमित वर्ग सुरू करण्यात आले. परंतु ते देखील फक्त अडीच महिनेच चालले. असे असताना देखील महाविद्यालयाने विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा घेऊन त्याचा निकाल जाहीर केला आहे. परंतु रिझल्ट घेताना विद्यार्थ्यांनी संपूर्ण फी भरल्याची पावती दाखवल्या नंतरच रिझल्ट देण्याचे कॉलेजने कळविले होते. अनेक विद्यार्थ्यांचे पालक कोरोना महामारीमुळे बेकार आहेत. अनेकांच्या नोकर्‍या गेलेल्या आहेत. तर अनेकांचे छोटे-मोठे धंदे बंद पडलेले आहेत. असे असताना शासनाकडून देखील सर्व शाळा व महाविद्यालयांना ही बाबत अडवणूक करू नये अशा सूचना दिलेल्या असताना, श्रीवर्धन येथील गोखले कनिष्ठ महाविद्यालया कडून विद्यार्थ्यांची फी संपूर्ण वसूल केल्यानंतरच रिझल्ट देण्यात येत आहेत.

राज्य परिवहन महामंडळामध्ये काम करणार्‍या अनेक पालकांचे पगार वेळेवर होत नसल्यामुळे तसेच पगार काही प्रमाणात झालेले नसल्यामुळे त्यांच्याकडे फी भरण्यासाठी पैसे उपलब्ध नसल्याने आपल्या मुलांसाठी ते रिझल्ट घेऊ शकले नाहीत. काही पालकांनी उधार पैसे घेऊन कॉलेजमध्ये येऊन फी भरल्यानंतर रिझल्ट देण्यात आला. कारण अकरावीचे रिझल्ट मिळाल्यानंतरच बारावी मध्ये प्रवेश घेता येणार असल्याने अनेकांची बारावीच्या प्रवेशासाठी धडपड सुरू होती. परंतु गोखले महाविद्यालयाच्या प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना फी भरण्याबाबत अडवणूक करण्यात येत असल्याचे पहायला मिळत होते. तरी राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या प्रकाराकडे लक्ष द्यावे अशी मागणी पालकांमधून केली जात आहे.

Exit mobile version