सौर दिव्याखाली अंधार; एमएमआरडीएचे लाखो रुपये फुकट

| नेरळ | वार्ताहर |

नेरळ गावात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कडून रस्त्यांची कामे करण्यात आली. त्या रस्त्याच्या दुतर्फा विजेचा प्रकाश असावा यासाठी लाखो खर्चून सौर दिव्यांचे पथदिवे उभारण्यात आले होते. मात्र, वर्षा आधीच बहुसंख्य पथदिवे बंद पडले आहेत. या ठिकाणी 2023 मध्ये पथदिव्यांवर सौर डीएव्ही लावण्यात आले. मात्र, 40 लाख खर्चून उभारण्यात आलेल्या सौर दिव्यांपकी बहुसंख्य पथदिवे बंद पडले आहेत. त्यात त्या बंद पडलेल्या पथदिव्यांवरील सोलर दिव्यांची दुरुस्ती करण्याची कोणतीही यंत्रणा नेरळ ग्रामपंचायतकडे नाही. त्यामुळे नेरळ गावातील सोलर दिवे बंद राहणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

प्राधिकरणाकडून केवळ सौरदिवे बसविण्याचे टेंडर होते. त्यावेळी निविदेप्रमाणे सौर दिव्यांमध्ये कोणत्या अडचणी निर्माण झाल्यास त्यांची दुरुस्ती करण्यासाठी काही कालावधी देखभाल दुरुस्ती म्हणून ठेवण्यात येत असतो. मात्र, नेरळ गावातील सौर दिवे बंद पडले असून त्यांची दुरुस्ती करण्यासाठी प्राधिकरणाकडून संबंधित ठेकेदाराला काही आदेश देणार आहात का, असा संतप्त सवाल नेरळ शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख हेमंत क्षीरसागर यांनी उपस्थित केला आहे. प्राधिकरणाने त्या ठेकेदाराकडून नेरळ गावातील सर्व पथदिवे यांची दुरुस्ती करून घ्यावी अन्यथा पक्षाच्या वतीने आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला आहे.

Exit mobile version