| पनवेल | वार्ताहर |
अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने घरात ओढून नेण्याचा प्रयत्न करणार्या युवकाच्या विरोधात पोक्सो कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या घटनेत आरोपीने पीडितेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचा आरोप ठेवण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. किशोर कोनाळे असे आरोपीचे नाव आहे.
पीडित अल्पवयीन मुलगी ही घराबाहेर तिच्या मैत्रिणीबरोबर खेळत होती. त्यावेळी आरोपीने तिला बोलावले, मात्र ती न आल्याने आरोपीने जबरदस्तीने स्वत:च्या घरात तिला ओढत नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पीडितेने आरडाओरडा केल्याने पीडितेचे नातेवाईक धावून आले व तिची सोडवणूक केली. जबरदस्तीने घरात घेऊन जात असताना आरोपीने तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्यामुळे याप्रकरणी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.