| पनवेल | वार्ताहर |
कामोठे भागात राहणार्या दोन तरुणांनी फेसबुकद्वारे 40 वर्षीय महिलेसोबत मैत्री करुन तिच्यासोबत काढलेले आक्षेपार्ह फोटो तिच्या पतीला पाठवून तसेच फेसबुकवरुन व्हायरल करुन सदर महिलेची बदनामी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
कामोठे पोलिसांनी या दोन्ही तरुणांविरोधात विनयभंगासह विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकरणात दाखल असलेले आरोपी हे दोघेही कामोठे परिसरात राहण्यास असून, यातील एकाने वर्षभरापूर्वी कामोठे भागात राहणार्या 40 वर्षीय महिलेसोबत फेसबुकद्वारे मैत्री केली होती. त्यावेळी त्याने सदर महिलेला कामोठे येथील लॉजवर नेऊन तिच्यासोबत आक्षेपार्ह फोटो काढले होते. सदरचे फोटो त्याने आपल्या मित्राला पाठवून दिल्यानंतर त्याने सदर महिलेला संपर्क साधून तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करण्यास सुरुवात केली. मात्र, पीडित महिलेने त्याला नकार दिल्याने संतप्त झालेल्या मित्राने या महिलेचे त्याच्या मित्रासोबत असलेले आक्षेपार्ह फोटो तिच्या पतीला पाठवून दिले. त्यानंतर सदरचे फोटो फेसबुकवरुनसुद्धा व्हायरल केले. सदर प्रकार पिडित महिलेला समजल्यानंतर या महिलेने सदर प्रकाराची माहिती आपल्या पतीला देऊन कामोठे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी या दोघांविरोधात विनयभंगासह विविध कलमाखाली गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.