सरकारी इव्हेंटमध्ये अधिकारी मशगुल

नागरिकांची दैनंदिन कामे खोळंबल्याने नाराजी

। रायगड । आविष्कार देसाई ।

जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून विविध व्हीव्हीआयपी व्यक्तींचे दौरे सुरु आहेत. प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह अख्ख्या मंत्रिमंडळाचा त्यामध्ये समावेश होता. एका मागून एक सरकारी इव्हेंट साजरे करण्यातच अधिकारी मश्गुल असल्याने नागरिकांची दैनंदिन कामे खोळंबली आहेत. दररोज प्रशासनाचे उंबरठे झिजवून जनतेची पायताणं फाटल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्याने सत्ताधारी पक्षांनी जनतेला चुचकारण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. आपण त्यांच्यासाठी काय-काय केले आहे आणि काय-काय करत आहोत, हे दाखवण्यासाठी सरकारी इव्हेंटचा सहारा घेतला जात आहे. सरकारी कामातून स्वतःचे ब्रॅण्डिंग करण्यात येत आहे. जनतेच्या पैशातून ही उधळपट्टी सुरू असल्याने विरोधकांसह जनतेतून नाराजी व्यक्त केली जात आहे.

‌‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम माणगाव येथे काहीच दिवसांपूर्वी पार पडला. या कार्यक्रमासाठी जिल्ह्याच्या विविध भागातून लाभार्थी आले होते. कार्यक्रमात स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विविध खात्याचे मंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार यांची उपस्थिती असल्याने कार्यक्रम भव्यदिव्य करण्याच्या सूचना प्रशासनाला होत्या. त्यामुळे महिनाभर आधीच कार्यक्रमाची तयारी सुरु होती. त्यानंतर उरण येथे अटल सेतुसह अन्य कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन तसेच विविध कामांचे भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यासाठीदेखील मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री, पाकमंत्र्यांसह अन्य मंत्री, खासदार, आमदार उपस्थित होते. या कार्यक्रमाची तयारीदेखील जोरात सुरु होती. एकामागून एक सरकारी इव्हेंट आल्याने साहजिकच नागरिकांचे कामे होणे अशक्य होते. आता पुन्हा दोन आठवड्यांनी मुख्यमंत्री रायगड जिल्ह्यात येणार आहेत. त्यामुळे सरकारी कामकाज पुन्हा ठप्प पडणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, काही अधिकाऱ्यांशी याबाबत विचारणा केली असता, त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला. आम्हाला कशाला अडचणीत आणता, आम्ही सरकारी नोकर आहोत, असे म्हणत सरकारी आदेशानुसार कामं करावी लागत असल्याचे त्यांनी बोलून दाखवले.

साहेब, कार्यालयात फिरकेच नाहीत
गेल्या महिनाभरापासून ठराविक दिवस सोडले, तर साहेब कार्यालयात फिरकलेच नाहीत. मंत्र्या-संत्र्यांच्या दौऱ्याची तयारी करण्यात, त्यांच्या मागे-पुढे करण्यातच त्यांचा अधिक वेळ वाया गेला आहे. जी सर… जी सर असे बोलून आता अधिकारीदेखील कंटाळले असल्याची दबक्या आवाजातील चर्चा जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांताधिकारी कार्यालये, तहसीलदार कार्यालय परिसरात ऐकालयला मिळत आहे.
फायली स्वाक्षरीविना; सुनावण्यांना तारीख पे तारीख
कार्यालयात कामानिमित्त साहेबांची भेट घेण्यासाठी नागरिक येत होते, मात्र साहेब बैठकीनिमित्त कधी मंत्रालयात, तर कधी व्हीसीमध्ये असल्याचे सांगण्यात येत असल्याने त्यांच्या फेऱ्या वाया गेल्या. विविध महत्त्वाच्या फायली स्वाक्षरीविना पडल्या आहेत. तसेच काही सुनावण्या पुढे ढकलण्यात आल्याने अनेकांची पंचायत झाली. नागरिक तर फेऱ्या मारतच होते, वकीलमंडळीदेखील प्रशासनाच्या अशा कारभारामुळे चांगलीच वैतागून गेल्याचे चित्र होते.
Exit mobile version