कॉलनी फोरमचे पदाधिकारी मातोश्रीवर

| पनवेल | वार्ताहर |

पालिका हद्दीतील दुहेरी मालमत्ता कराचा मुद्दा उचलून लढत असलेल्या कॉलनी फोरमच्या पदाधिकार्‍यांनी आज ‘मातोश्री’वर युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी फोरमच्या पदाधिकार्‍यांनी आदित्य ठाकरे यांच्याशी मालमत्ता कर तसेच, पालिका हद्दीतील विविध समस्याबाबत चर्चा केल्याचे समजते.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रायगड जिल्हा ह्यांच्यावतीने, मावळ लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे ह्यांना पाठींबा देण्यासाठी कॉलनी फोरमकडे मागणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने ही भेट घेण्यात आली असल्याचे या वेळी सांगण्यात आले. माजी नगरसेविका लीना गरड अध्यक्ष असलेल्या कॉलनी फोरम संस्थेने पनवेल पालिकेने आकारलेल्या मालमत्ता कराविरोधात सातत्याने भूमिका घेतली असून पालिका हद्दीतील खारघर, कामोठे वसाहती सोबतच इतर वसाहतीमध्ये कॉलनी फोरमच्या माध्यमातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते कार्यरत असून, महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना कॉलनी फोरमचा पाठिंबा मिळाल्यास महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पनवेल विधानसभा क्षेत्रात बळ मिळण्याची शक्यता आहे. शुक्रवारी (दि.5) घडलेल्या भेटी दरम्यान शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, बबन पाटील, कॉलनी फॉरमच्या अध्यक्ष लीना गरड तसेच त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते. तसेच शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर, शिवसेना विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, तालुका संपर्कप्रमुख योगेश तांडेल आणि गणेश म्हात्रे देखील या वेळी उपस्थित होते. शुक्रवारी झालेल्या बैठकीनंतरच कॉलनी फोरमच्यावतीने योग्य निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती फोरमच्यावतीने देण्यात आली.

Exit mobile version