अधिपरिचारीकांना सेवेत घेण्याची आ. जयंत पाटील यांची मागणी
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जिल्हयातील जी.एन.एम. प्रशिक्षणार्थी अधिपरिचारीका प्रशिक्षण अलिबाग जिल्हा रुग्णालयात तीन वर्ष प्रशिक्षण पूर्ण करून सन २०१९-२० मध्ये उत्तीर्ण झालेल्या अधिपरिचारीकांना १८ महिन्यांचे शासकीय नियुक्ती आदेश तात्काळ देण्यात येवून त्यांना सेवेत रूजू करून घेण्यात यावे अशी मागणी विशेष उल्लेखाद्वारे शेकापचे आ. जयंत पाटील यांनी आज सभागृहात केली.
जी.एन.एम.प्रशिक्षण अधिपरिचारीका प्रशिक्षण अलिबाग जिल्हा रुग्णालयात ऑगस्ट २०१७ मध्ये आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सुरू केले त्यावेळी संबंधित प्रशिक्षकांकडून बंधपत्र करून घेण्यात आले होते. सदर प्रशिक्षणार्थ्यांनी कोरोना कालावधीत काम करून त्यांचे प्रशिक्षण ३ वर्षांचा कालावधी जवाबदारीने पूर्ण करून सन २०१९ २० मध्ये उत्तीर्ण झालेले आहेत. संबंधित परिचारीकांचे प्रशिक्षण पूर्ण होण्याआधी दि. २८ जून २०१९ मध्ये प्राप्त शासन निर्णय क्रासप्रनि २०१९/प्र.क्र.११८/ सेवा-५ दि. १५.४.२०१५ नुसार बंधपत्र घेण्याचे बंद करण्यात आल्याचे कळविण्यात आले असून त्यावेळी अलिबाग सिव्हिल हॉस्पिटल व आरोग्य विभागातील इतर वरिष्ठ अधिकारी यांनी संबंधित शासन निर्णय परिपत्रकाचा कोणताही परिणाम होणार नसून परिचारीकांना १८ महिन्यांच्या नियुक्तीचे आदेश लवकरच देण्यात येतील असे सांगितले गेले मात्र तरीसुद्धा दि. २८.१२.२०२९ रोजी उपसंचालक कार्यालय आरोग्य विभाग ठाणे येथे समाजक्रांती आघाडीचे शिष्टमंडळ व अधिपरिचारीका यांचे प्रतिनिधी व उपसंचालक, आरोग्य विभाग, ठाणे यांच्यासमवेत चर्चा केली असता त्यांनी शासन निर्णय प्रनि २०१४ /अधिप/प्र.क्र.९५/ सेवा- ५ दि. १५.४.२०१५ चा उल्लेख करून या शासन निर्णयामुळे १८ महिन्याचे नियुक्ती आदेश देता येणार नाही असे सांगितल्याने प्रशिक्षणार्थ्याची फसवणूक करण्यात आली. परंतु लातूर व पुणे विभागातील सन २०१९- २० मध्ये उत्तीर्ण झालेल्या बॅचच्या अधिपरिचारिकांना १८ महिन्यांचे नियुक्तीचे आदेश देण्यात आल्याने रायगड जिल्हयातील अधिपरिचारिकांवर मोठ्या प्रमाणात अन्याय झाले आहेत. संवब रायगड जिल्हयातील जी.एन.एम. प्रशिक्षणार्थी अधिपरिचारीका प्रशिक्षण अलिबाग जिल्हा रुग्णालयात तीन वर्ष प्रशिक्षण पूर्ण करून सन २०१९-२० मध्ये उत्तीर्ण झालेल्या अधिपरिचारीकांना १८ महिन्यांचे शासकीय नियुक्ती आदेश तात्काळ देण्यात येवून त्यांना सेवेत रूजू करून घेण्यात यावे यासाठी शे.का.पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी आज सभागृहात विशेष उल्लेखाद्वारे मागणी केली.