नवे मुख्यमंत्री सिद्धरमय्या, तर डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री
| कर्नाटक । वृत्तसंस्था ।
कर्नाटकात अनेक दिवसांच्या विचारमंथन, बैठकांच्या सत्रानंतर मुख्यमंत्री कोण होणार याचं चित्र स्पष्ट झालं आहे. आता काँग्रेसनं कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री सिद्धरमय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्या नावाची घोषणा केली आहे. तसेच, काँग्रेसकडून शपथविधी सोहळ्याचा दिवसही निश्चित करण्यात आला आहे. 20 मे रोजी दुपारी 12.30 वाजता शपथविधी सोहळा होणार आहे. या दिवशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील इतर मंत्रीही शपथ घेणार असल्याचं केसी वेणुगोपाल यांनी सांगितलं आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल म्हणाले की, सिद्धरमय्या कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री असतील, तर डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री असतील. 13 मे रोजी पक्षाला बहुमत मिळाले, 14 मे रोजी सीएलपीची बैठक झाली, ज्यामध्ये काँग्रेस पक्षानं निरीक्षकांची नियुक्ती केली. बैठकीत सर्वानुमते ठराव संमत करून विधीमंडळ पक्षनेते निवडीचे अधिकार पक्षाध्यक्षांना देण्यात आले. यानंतर आमदारांचं मत जाणून घेण्यासाठी बंगळुरूला पाठवलेले पक्षाचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, जितेंद्र सिंह आणि दीपक बाबरिया हे तीन निरीक्षक सोमवारी दिल्लीत परतले. या नेत्यांनी आमदारांची मत जाणून घेण्यासाठी गुप्त मतदानही घेतलं.
काँग्रेस हा लोकशाहीवादी पक्ष आहे. आमचा एकमतावर विश्वास आहे, हुकूमशाहीवर नाही. सिद्धरमय्या आणि डीके शिवकुमार हे दोघंही पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे आता सिद्धरमय्या कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री असतील, तर डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री असतील.
केसी वेणुगोपाल, काँग्रेस सरचिटणीस