। अलिबाग । प्रतिनिधी ।
तुमचे मागच्या महिन्याचे वीज बिल भरले नसून आज रात्री 9.30 नंतर आपला वीज पुरवठा मुख्य कार्यालयातून बंद करण्यात येणार असल्याचा मेसेज सध्या तुफान व्हायरल होत असून त्या माध्यमातून नागरिकांकडून पैसे उकळले जात आहेत. या मेसेजमध्ये कस्टमर केअरचा नंबर दिल्यामुळे अनेक ग्राहक त्या क्रमांकावर संपर्क साधून याबाबत विचारणा करीत आहेत. त्यानंतर समोरील व्यक्ती सिस्टिममध्ये अपडेट करण्यासाठी काही प्रक्रिया पार पाडण्याबाबत माहिती देत आहे. या माध्यमातून अनेकांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

याबाबत महावितरणच्या अधिकार्यांना विचारणा केली असता हा मेसेज खोटा असल्याचे सांगगितले. तसेच नागरिकांना अशा मेसेजवर विश्वास ठेवू नये, त्यांना कोणतीही माहिती देऊ नये, असे सांगितले.
या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण परसले असून आरोपींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
प्रत्येक ग्राहकाला असे मेसेज येत आहेत. महावितरण कोणालाही व्यक्तीगत असे मेसेज किंवा फोन करत नाही. आणि एखादयाचा विज पुरवठा बंद करायचा झालाच तर तो ऑफिसच्या वेळतेच म्हणजे सकाळी 8.30 ते संध्याकाळी 6 पर्यंतच केला जातो. त्यामुळे अशा कोणत्याही मेसेजवर विश्वाास ठेवू नये तसेच त्यांना कोणत्याही प्रकारची माहिती देऊ नये.
संदिप म्हात्रे
महावितरण अधिकारी