एलईडी मासेमारीमुळे तीन हजार नौका किनार्यावर
| मुरूड | प्रतिनिधी |
रायगडच्या समुद्रात पुन्हा बेकायदेशीर एलईडी मासेमारीमुळे खोल समुद्रात असणारे खतरनाक आग्या जेलिफिश सक्रिय झाले आहे. यामुळे बागमांडलापासून श्रीवर्धनपर्यंत आणि मुरूडपासून अलिबागपर्यंतच्या समुद्रात सुमारे तीन हजार नौकांची मासेमारी ठप्प झाल्याची माहिती मुरूड तालुक्यातील एकदरा या गावातील नाखवा आणि मच्चीमारांनी गुरुवारी बोलताना दिली. यामुळे मार्केट मध्ये ऐन सीझनमध्ये मोठी मासळी उपलब्ध होताना दिसत नाही. या प्रकारामुळे मच्छिमारांचे अतोनात नुकसान होताना दिसत आहे. शासन यावर कोणत्याही प्रकारची प्रभावी उपाययोजना करीत नसल्याबद्दल मच्छिमारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहेे.
बेकायदेशीर एलईडी मासेमारीमुळे पारंपारिक मच्छिमारांना मासळी मिळणं अवघड झाले झाल्याने हजारो नौका किनार्यावर नांगरून ठेवण्यात आल्या आहेत. त्यात रायगडच्या समुद्रात जेलिफिशचे संकट वाढल्याने मासेमारी खूप घटली असल्याची तक्रारही अनेक मच्छिमारांनी केली आहे. जेलिफिशचे 27 प्रकार असून आग्या जेलिफिश आधिक दाह होणारा त्यातीलच एक प्रकार आहे.
एलईडी मच्छिमारांच्या जीवावर
रात्रीच्या वेळी समुद्रात 1 लाख रुपये मूल्य असणार्या 1ते 2 हजार क्षमतेच्या प्रखर दिव्याच्या माध्यमातून केली जाणारी एलईडी मासेमारी हा प्रकार पारंपरिक मच्छिमारांच्या जीवावर उठला आहे. या प्रकारामुळे खोल समुद्रात असणारे जीव म्हणजे जेलिफिश किनार्यावर येत असून पारंपरिक मच्छिमारांच्या जाळयात सापडत आहेतय हे अत्यंत दाहक असून यांचा दंश देखील जीवघेणा ठरू शकतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. नुसत्या स्पर्शाने देखील मोठा दाह निर्माण होत असून आग्या जेलिफिश खतरनाक ठरू शकतात, अशी माहिती मच्छिमारांनी दिली.
एकदरा या गावचे हनुमान मच्छिमार सहकारी सोसायटीचे चेअरमन श्री पांडुरंग आगरकर, व्हाईस चेअरमन पांडुरंग थोकजी, नौकामालक सर्वश्री नारायण सावकार, रोहन निशानदार, अरुण सावकार, हरिश्चंद्र आगरकर, गजानन वाघ, यांनी सांगितले की, समुद्रात पुन्हा जेलिफिश आल्याने नेहमी मिळणारी मासळी मिळायची बंद झाली आहे. डिझेलचा खर्च देखील सुटत नाही अशी आमची अवस्था आहे. प्रपंच चालावायचा कसा ? असा प्रश्न पडला आहे. श्रीवर्धन, भरडखोल, बागमांडला, बाणकोट खाडी, दिघी, बोर्ली, मुरूड, अलिबाग परिसरातील सुमारे नौका किनार्यावर नांगरून असून मासेमारी ठप्प असल्याची माहिती या सर्व मच्छिमारांनी दिली. एलईडी मासेमारीतून मिळणारी अलिबाग येथील मासळी मुरूड मार्केटला येत आहे.
नौकामालक हरिश्चंद्र आगरकर म्हणाले की, मार्गशीर्ष महिन्यात गेल्या वर्षी आताच्या चौपटीने कोळंबी मिळाली होती. यंदा त्याच्या पावपटीने देखील कोळंबी मिळालेली नाही. मोठया नौकेसाठी म्हणजे (6 सिलेंडर्सवाली नौका) किमान 7 खलाशी असणे गरजेचे असते. 2 हजारावर डिझेल लागते. त्या मानाने खर्च करूनही निम्मे पैसे देखील मिळत नसतील तर मासेमारी कशी करायची, असा प्रश्न उपस्थित केला आहे.पर्यटकांना देखील येथील ताजी मासळी मिळणे अवघड झाले असून आयात मासळीचे भाव गगनाला भिडले आहेत.