| उरण | वार्ताहर |
जेएनपीए बंदर परिसरातून डिझेल व ऑईलची तस्करी करणाऱ्या दोन चोरट्यांना पकडण्यास वाहन चालकांना यश आले आहे. तर दोन चोरटे हे चोरीसाठी वापरलेल्या गाडीत मुद्देमाल टाकून अंधारात पसार झाल्याची घटना गुरुवारी (दि. 10) पहाटे 5 च्या सुमारास घडली आहे. या घटनेची माहिती न्हावा शेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांना मिळताच त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ चोरट्यांना ताब्यात घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
गुरुवारी जेएनपीए बंदर पीयुबी या परिसरातील रस्त्यांवरुन डिझेलची तस्करी करणारे चोरटे हे गुजरातचा क्रमांक असलेल्या वाहनातून डिझेल व ऑईल चोरुन जात असल्याची माहिती वाहन चालकांना मिळताच वाहनचालकांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आपली वाहने रस्त्यावर आडवी- उभी केली. आणि सदर चोरट्यांची गाडी अडवून सदर गाडीची पाहणी केली. त्यात डिझेल व आँईल भरलेले ड्रम दिसले.यावेळी संतप्त झालेल्या वाहन चालकांनी चोरट्यांना चोप दिला.
दोन चोरटे हे चोरीसाठी वापरलेल्या गाडीत मुद्दे माल टाकून अंधाराचा फायदा घेवून पसार झाले. घटनेची माहिती न्हावा शेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांना मिळताच त्यांनी पोलीस कर्मचारी वर्गाच्या मदतीने चोरट्यांना ताब्यात घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.या घटनेसंदर्भात न्हावा शेवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.