| उरण | वार्ताहर |
उरण पुर्व विभागातील पिरकोण, आवरे, गोवठणे, बांधपाडा (खोपटा) ग्रामपंचायत हद्दीतील पारंगी, सांगपाले खार, काशी, पारंगी, रेवचा वळा खार या खाडीकिनाऱ्यावरील बांधबंदिस्ती उधाणाच्या पाण्यात उध्दवस्त झाली आहे. त्यामुळे खारेपाणी हे शेत जमिनीत शिरल्याने लागवडीखाली आलेली भात शेती नष्ट झाली आहे. त्यामुळे हजारो एकर भात शेती नापीक होण्याचा धोका निर्माण झाला आहे.या ओढावलेल्या अस्मानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
खारलँड विभाग पेण कार्यालयातील अधिकारी वर्गाने उरण तालुक्यातील खाडीकिनाऱ्यावरील बांधबंदिस्तीची कामे राबविण्यासाठी पुढाकार न घेतल्याने भात शेतीचे संरक्षण करणारी बांधबंदिस्ती उध्दवस्त होत आहे.त्यामुळे समुद्रातील खारे पाणी हे शेत जमीनीत शिरूर पिरकोण,आवरे, गोवठणे, बांधपाडा ( खोपटा ) ग्रामपंचायत हद्दीतील पारंगी,सांग पाले खार,काशी,पारंगी,रेवचा वळा खार या परिसरातील हजारो एकर भात शेती नापीक होण्याचा धोका निर्माण झाला आहे.तरी शासनाने पुढाकार घेऊन भात शेती वाचविण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
धाणाचा तडाखा हा तालुक्यातील 23 ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांना तसेच भात शेतीला मोठ्या प्रमाणात बसला आहे. भातशेती चिखलयुक्त झाली आहे.तरी महसूल विभागाने शेतकऱ्यांना लवकरच लवकर नुकसान भरपाई द्यावी आणि खारलँड विभाग पेण कार्यालयातील अधिकारी वर्गाने सदर शेतीची पाहणी करून तातडीने खाडीकिनाऱ्यावरील बांधबंदिस्तीची कामे मार्गी लागण्यासाठी पुढाकार घ्यावा नाहीतर समुद्राच्या उधाणाचे पाणी रहिवाशांच्या घरात शिरेल
अनिल पाटील,पिरकोण
आवरे, गोवठणे , बांधपाडा , पिरकोण सारख्या इतर ग्रामपंचायत हद्दीतील खाडीकिनाऱ्यावरील बांधबंदिस्ती फुटल्याने समुद्राचे पाणी हे भात शेतीत शिरले आहे.त्या संदर्भात खारलँड विभागाकडून पाहणी करून तशा प्रकारचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे.
सुरेश सावंत कार्यकारी अभियंता खारलँड विभाग पेण