। खोपोली । वार्ताहर ।
लोखंड उत्पादन करणार्या पुष्पम फोर्जिंग कंपनीत फर्नेस ऑईलचा भडका होऊन भीषण आग लागल्याची घटना शनिवारी (दि.4) रात्री 9.45 वाजता घडली. होनाड ग्रामपंचायत हाद्दीतील टेंभेवाडी गावाशेजारी पुष्पम फोर्जिंग कंपनीत लोखंड उत्पादन केले जाते. शनिवारी रात्री कंपनीत 100 च्या आसपास कामगार कामावर हजर होते. आग लागलेल्या ठिकाणी 30 कामगार काम करीत होते. त्यावेळी प्लांटमधील फर्नेस ऑईलचे तापमान वाढल्यामुळे भडका उडाला. परिणामी, बाजूलाच असलेल्या साहित्यांना भीषण आग लागली.
यावेळी उपस्थित कामगारांनी प्रसंगावधान बाळगत खोपोली नगरपालिकेच्या अग्निशमन विभाला माहिती कळवली. अग्निशमन दलाचे प्रमुख हरी सूर्यवंशी यांनी 15 मिनिटात अग्निशमन दलाचे जवान संतोष पवार, सावळाराम पाटील, रामिज शेख, पंकज इंगवले यांना पाचारण करीत आग विझविण्यासाठी प्रयत्न केला. घटनास्थळी पोलीस निरिक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक सुधाकर लहाने, गोपनीय विभागाचे अजिंक्य पाटील, कादीर तांबोळी, चालक कोळी तसेच अपघातग्रस्त टीमने पोहचून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मदत केली.
कंपनीत लागलेली आग काही मिनिटात आटोक्यात आली नसती तर आग सर्वत्र पसरून भीषण घटना घडली असती. मात्र, आग विझविण्यासाठी मदतकार्य करणारे अग्निशमन दल आणि पोलीस तसेच अपघातग्रस्त टीमने केलेल्या प्रयत्नामुळेच आग आटोक्यात आली.
– सुधाकर लहाणे, पोलीस उपनिरीक्षक