| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वर्सोवा पुलावरुन ऑइल वाहतूक करणारा ट्रँकर खाडीत कोसळला. ही घटना सोमवारी (दि.23) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली आहे. या भीषण दुर्घटनेमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरुन विरार येथून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरुन ऑइलने भरलेला टँकर निघाला होता. या टँकरची सकाळी जुन्या वर्सोवा पुलावर पोहोताच रस्त्यावर असलेल्या दुसऱ्या वाहनाला धडक झाली. त्यानंतर चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटले. पुलाचा कठडा तोडून टँकर खाडीच्या पाण्यात पडला.
टँकर खाडीमध्ये कोसळल्याने मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काही काळ वाहतुक कोंडी निर्माण झाली होती. या घटनेची माहिती मिळताच काशिगाव पोलीस व वाहतूक विभाग यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. लगेचच मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला देखील पाचारण करण्यात आले. आतापर्यंत एका 40 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह खाडीतून बाहेर काढण्यात आला आहे. अन्य कोणी व्यक्ती त्याच अडकला आहे का याचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याशिवाय हा ऑइल वाहतूक घेऊन जाणारा टँकर बाहेर काढण्यासाठीचे प्रयत्न देखील सुरु आहेत. वर्सोवा पुलावर झालेल्या दुर्घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.