ओलमण नळपाणी योजनेचे तीनतेरा

ठेकेदार अधिकारी वर्गाला जुमानत नाही

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील ओलमण या आदिवासी बहुल गावातील नळपाणी योजना ठेकेदाराच्या मनमानी मुळे रखडली आहे. जल जीवन मिशन मधील या योजनेच्या कामाचे कार्यादेश जून 2021 मध्ये देण्यात आले होते आणि मुदत संपून गेली तरी योजनेचे जेमतेम काम पूर्ण झाले असून त्या बदल्यात 30 टक्के बिल अदा करण्यात आले आहे. दरम्यान, लघुपाटबंधारे विभाग यांनी या कामाबद्दल जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभगाचे कार्यकारी अभियंता यांना हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे, तर ठेकेदाराला अनेकदा नोटिसा देवून देखील काम पुढे जात नसल्याने ओलमण ग्रामस्थांच्या डोक्यावरील हंडा हातात येण्याची चिन्हे नाहीत.

कर्जत चे पहिले आमदार कुशाबा 560 लोकसंख्या असलेल्या ओलमण गावात अनेक वर्षे पिण्याच्या पाण्याची समस्या आहे.ती समस्या दूर करण्यासाठी जल जीवन मिशन मधून नळपाणी योजना मंजूर करण्यात आली होती. या नळपाणी योजनेचे कामासाठी 67 लाख 42 हजाराचा निधी मंजूर होता. तेथील सावतपाडा भागातील लघुपाटबंधारे विभागाच्या विहिरीवर उदभव आणि तेथून चढावावर असलेल्या ओलमण गावात पाणी नेवून घरोघरी पाणी देण्याची योजना बनविण्यात आली होती. या योजनेचे कामाचे कार्यादेश जून 2021 पर्यंत देण्यात आले होते आणि यावर्षी या योजनेचे काम पूर्ण करण्याची मुदत देखील संपली आहे. मात्र योजनेचे काम संथगतीने सुरू असल्याने रायगड जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभाग यांच्याकडून डिसेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र मुदत वाढ देवून पाच महिन्यांचा कालावधी लोटला तरी ओलमण नळपाणी योजनेचे काम पुढे जाताना दिसत नाही.या नळपाणी योजनेतील जलवाहिन्या शिवाय अन्य कोणतेही काम ठेकेदाराने केले नाही. त्यामुळे नळपाणी योजनेचे काम रखडले असून ठेकेदाराला संबंधित विभागाकडून अनेक नोटिसा देण्यात आल्या आहेत. मात्र ठेकेदाराने त्या सर्व नोटिसा यांना केराची टोपली दाखवली असून या ठेकेदाराने मनमानी करीत ओलमण नळपाणी योजनेचे काम पूर्णपणे थांबवून ठेवले आहे.

या नळपाणी योजनेसाठी आणण्यात आलेल्या जलवाहिन्या या टाकण्यासाठी रस्त्याच्या कडेने खोदकाम केले आहे. पावसाळा सुरू होण्याआधी खोदलेल्या खड्ड्यात जलवाहिन्या देखील टाकण्यात आलेल्या नाहीत. तर अन्य कोणतेही कामे ठेकेदाराने केली नाहीत.त्यामुळे संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत. ग्रामस्थांच्या मागणीनंतर जिल्हा परिषदेचे कर्जत उप विभागीय उप अभियंता यांनी ओलमण येथे जावून पाहणी केली. मात्र ठेकेदाराची मनमानी जिल्हा परिषद प्रशासन आणि जनतेसमोर पुन्हा आली असून ठेकेदाराच्या मनमानीमुळे ओलमण नळपाणी योजना रखडली आहे. याबाबत शाखा अभियंता अनिल मेटकरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित कामाचे ठेकेदार आमच्या सूचना आणि नोटीस यांना कोणतेही उत्तर देत नाही आणि त्या नोटीस नुसार कार्यवाही देखील करीत नाहीत. त्यामुळे आम्ही आता रायगड जिल्हा परिषदेचे लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता संजय वेंगुर्लेकर यांना पत्र देत असून संबंधित ठेकेदाराला आपल्या माध्यमातून सूचना देण्यात याव्यात आणि ही योजना मार्गी लागावे यासाठी विनंती करणार आहेत.

Exit mobile version