डागडूजी अभावी बनलेय धोकादायक; परिणामी प्रवाशांचा वावरही पूर्णतः कमी
| चिपळूण | प्रतिनिधी |
चिपळूणच्या मुख्य बाजारपेठेतील जुन्या बसस्थानकाची इमारत देखभाल, दुरुस्तीअभावी धोकादायक झाली आहे. त्याचे छप्पर कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे प्रवाशांचा वावरही पूर्णतः कमी झाला आहे. एकीकडे बसस्थानकाची हक्काची इमारत असतानाही दुसरीकडे धोकादायक स्थितीमुळे एसटी वाहतुक कक्षांसाठीची शेड आगार प्रशासनाला नाईलास्तव इमारतीच्या बाहेर उभारावी लागली आहे.
जुना एसटी बसस्थानक सुस्थितीत कधी होणार? जुना चिपळूण बसस्थानक इमारतीची वेळीच देखभाल, दुरुस्ती झाली असती तर हा मन:स्ताप आगार प्रशासनाला सहन करावा लागला नसता. मध्यवर्ती बसस्थानकातून सुटणाऱ्या बसेस खाडी परिसरासह गुहागर मार्गाकडे जाण्यासाठी जुन्या बसस्थानकातून निकडणी करून पुढे नियोजित प्रवासासाठी जातात. त्या मार्गावरच्या प्रवाशांना बाजारपेठेतील खरेदीनंतर पुन्हा प्रवासाला निघण्यासाठी हे सोयीस्कर पडत असल्याने कायमच या बसस्थानकात प्रवाशांची गर्दी असते. असे असताना गेली कित्येक वर्षे या बसस्थानकाच्या इमारतीची देखभाल व दुरुस्ती न झाल्याने ही इमारत धोकादायक बनली आहे.
काही वर्षापूर्वी पावसाळ्यात या इमारतीच्या एकाबाजूचे छप्पर जमीनदोस्त झाले तर उर्वरित छपराची दयनीय स्थिती झाल्याने ते कोणत्याही क्षणी कोसळू शकते. अशा प्रकारामुळे त्यातील प्रवाशांचा वावर पूर्णतः कमी झाला असून प्रवासी ऊन, पाऊस सहन करत बसस्थानकाबाहेर उभे राहून एसटीची वाट पाहत असतात. यामुळे बसस्थानकाची इमारत केवळ नावालाच उरली आहे, असे बोलले जात आहे. मात्र त्या ठिकाणी मद्यपींचा वावर कायम असतो. यावर उपाय म्हणून काही दिवसापूर्वी आगार प्रशासनाने या बसस्थानकात स्वतंत्र एसटी कर्मचाऱ्याची नेमणूक केली आहे. यामुळे खासगी पार्किंग बंद झाले. नेमणूक करण्यात आलेले कर्मचारी बसस्थानकात येणाऱ्या बसेसच्या नोंदी करतात.
इमारतीबाहेर उभारला वाहतूक कक्ष
मुळातच बसस्थानकाची इमारत देखभाल, दुरुस्तीअभावी धोकादायक झाल्याने अशा इमारतीत हा कक्ष उभारणे अशक्य होते. आगार प्रशासनाने नवी शक्कल लढवत हा कक्ष इमारतीबाहेर उभारला आहे. तसे पाहिल्यास एकीकडे जुन्या बसस्थानकाची इमारत हक्काची असतानाही दुसरीकडे धोकादायक स्थितीमुळे वाहतूक कक्षाची शेड आगार प्रशासनाला नाईलाजास्तव इमारतीबाहेर उभारावी लागली आहे.
