जुन्या वाचनालयाचा ठेवा जतन करणार: मुख्याधिकारी

| माथेरान | वार्ताहर |

माथेरानमधील करसंनदासजी मुलजी वाचनालयास माथेरानचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी भेट देऊन 100 वर्षांहून अधिक काळ उपलब्ध असलेल्या पुस्तकांची पाहणी केली. त्यानंतर येथील हा पुस्तकी ठेवा जतन करून नवीन पिढीसाठी याचा लाभ व्हावा यासाठी सूचनाही देऊन स्वतः त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

जिल्ह्यातील सर्वात जुन्या ग्रंथालयापैकी एक असलेले माथेरानचे करसंनदास मुळजी वाचनालयाची जागा 1897 साली दामोदर गोवर्धनदास यांनी करसंनदास यांच्या नावे दान केली होती. त्यानंतर येथे करसंनदासजी मुलजी ग्रंथालय असे नामकरण करून भव्य ग्रंथालय उभारण्यात आले. त्यामुळे या वास्तूचे एक ऐतिहासिक महत्त्व आहे. येथे इंग्रजीमध्ये असलेली अनेक दुर्मिळ पुस्तके इतर कोठेही आढळणार नाहीत. अनेक जगविख्यात लेखकांच्या दुर्मिळ पुस्तकांचा खजिनाच असून, जवळपास 1300 पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध आहेत. माथेरान नगरपालिकेच्या माध्यमातून यांची योग्यप्रकारे येथे जोपासना केली जात आहे.

नगरपालिकेने येथील वाचक संख्या वाढविण्यासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत. माथेरानसारख्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करता यावी यासाठी दोन अभ्यासिका या ठिकाणी उभारण्यात येणार आहेत. लहान मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्या संकल्पनेतून एक दिवस पुस्तकांसाठी हा अनोखा उपक्रम राबविला जाणार असून, त्याद्वारे विद्यार्थ्यांना वाचनालयात नेऊन त्यांच्या आवडीची पुस्तके उपलब्द केली जाणार आहेत.


125 वर्षांचा ठेवा जतन करून ठेवताना त्याचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना व पर्यटकांना व्हावा याकरिता नगरपालिकेकडून नवनवीन उपक्रम राबविले जाणार आहेत. पुस्तकांच्या माध्यमातून नवीन पिढीच्या सक्षमीकरणासाठी वाचनालयामार्फत प्रयत्न करणार.

राहुल इंगळे, प्रशासक तथा मुख्याधिकारी, माथेरान
Exit mobile version