| पनवेल | वार्ताहर |
पनवेल भागातील घरगुती डे-केअरमध्ये जाणार्या पाच वर्षीय मुलीसोबत घरातील 78 वर्षीय वृद्धाने अश्लील चाळे केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारानंतर पनवेल शहर पोलिसांनी या वृद्ध व्यक्तीविरोधात विनयभंगासह पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच पुढील कार्यवाही सुरु केली आहे.
या प्रकरणातील आरोपी 78 वर्षीय वृद्ध व्यक्तीची सून त्यांच्या घरामध्ये घरगुती डे-केअर चालवते. तसेच त्यांची सून आपल्या घरामध्ये खासगी शिकवणीसुद्धा घेते. याच डे-केअरमध्ये पनवेलमध्ये राहणारे डॉक्टर दाम्पत्य आपली पाच वर्षीय मुलगी आणि तीन वर्षांचा मुलगा या दोघांना पाठवत होते. ऑक्टोबर महिन्यामध्ये डॉक्टर दाम्पत्याला दोन दिवस रात्रपाळीवर कामाला जायचे असल्याने त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना दोन्ही वेळेस रात्रीच्या सुमारास या डे-केअरमध्ये ठेवले होते. यादरम्यान रात्रीच्या वेळेस घरातील वृद्ध व्यक्तीने डॉक्टरच्या पाच वर्षीय पीडित मुलीसोबत अश्लील चाळे केले. हा प्रकार पीडित मुलीने आपल्या आई-वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी तिच्याकडे सखोल विचारपूस केल्यानंतर नानूने तिच्यासोबत रात्रीच्या वेळी दोन वेळा अश्लील चाळे केल्याचे सांगितले. त्यानंतर डॉक्टर दाम्पत्याने पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी 78 वर्षीय वृद्ध व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करुन पुढील कार्यवाहीला सुरुवात केली आहे.