स्वप्नीलला ऑलिंपिकची संधी

50 मीटर रायफल थ्री पोझिशन पात्रता फेरीत दमदार कामगिरी

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

भारतीय नेमबाजी संघटनेच्यावतीने पॅरिस ऑलिंपिकसाठी पात्रता फेरीचे आयोजन करण्यात येत आहे. 25 मीटर पिस्तूल या प्रकाराची चौथी पात्रता फेरी मंगळवारी आटोपल्यानंतर आता बुधवारपासून पुरुष व महिला अशा दोन्ही विभागांसाठी 50 मीटर रायफल थ्री पोझिशन या प्रकारच्या पात्रता फेरीला सुरुवात झाली.

महिला विभागात अंजुम मौदगिल (592 गुण) हिने पहिला क्रमांक मिळवला, तर पुरुष विभागात ऐश्‍वर्य प्रताप सिंग तोमर (590 गुण) याने बाजी मारली. महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसळेने (587 गुण) दुसरे स्थान मिळवले. ऐश्‍वर्यसह स्वप्नीलला पॅरिस ऑलिंपिकचे तिकीट बुक करण्याची उत्तम संधी असणार आहे. या प्रकाराची अंतिम लढत उद्या होणार आहे. 50 मीटर रायफल थ्री पोझिशन या प्रकाराची तिसरी पात्रता फेरी सुरू आहे. याची अंतिम फेरी गुरुवारी रंगेल. त्यानंतर पुढच्याच दिवशी चौथ्या अर्थातच अखेरच्या पात्रता फेरीला सुरुवात होईल.

चार पात्रता फेरींमधून जे नेमबाज सातत्यपूर्ण कामगिरी करतील त्यांनाच पॅरिस ऑलिंपिकमध्ये प्रवेश करण्याची संधी असणार आहे. पुरुषांच्या विभागात ऐश्‍वर्य तोमर, स्वप्नील कुसळे यांच्यासह अखिल शिओरॅन (584 गुण) याने तिसरा क्रमांक पटकावत दावेदारी पेश केली. चेन सिंग व नीरजकुमार यांनी अनुक्रमे चौथा व पाचवा क्रमांक पटकावला. सिफ्ट सामरा दुसर्‍या स्थानीमहिला विभागातील पात्रता फेरीत अंजुम मौदगिल हिने पहिले स्थान मिळवले; पण भारताची पहिल्या क्रमांकाची खेळाडू व विश्‍वविक्रम नावावर असलेली सिफ्ट कौर सामरा हिनेही चुणूक दाखवली. तिने 589 गुणांसह दुसरा क्रमांक मिळवला व आपले आव्हान कायम ठेवले. आशी चौकसी, निश्‍चल व श्रीयांका सदांगी यांनी अनुक्रमे तिसरा, चौथा व पाचवा क्रमांक पटकावला.

10 मीटर एअर पिस्तूलची पात्रता फेरी आज
50 मीटर रायफल थ्री पोझिशनच्या तिसर्‍या पात्रता फेरीची अंतिम लढत उद्या असून याच दिवशी पुरुष व महिला अशा दोन्ही विभागांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारच्या पात्रता फेरीला सुरुवात होणार आहे. शुक्रवारी या पात्रता फेरीची अंतिम लढत पार पडणार आहे.
Exit mobile version