ओम् श्री साईनाथ सेवा ट्रस्ट कबड्डी स्पर्धा

आदर्श क्रीडा मंडळाची बाजी

| मुंबई | प्रतिनिधी |

आदर्श क्रीडा मंडळाने ओम् श्री साईनाथ सेवा ट्रस्टने आयोजित केलेल्या पुरुष द्वितीय श्रेणी(स्थानिक) गटात विजेतेपद पटकाविले. पंचगंगाचा रविंद्र साळुंखे ठरला स्पर्धेत सर्वोत्तम, तर आदर्श मंडळाचा सुशील वाडकरला लक्षवेधी कोपरारक्षकाचा मान. साळुंखेला सायकल, तर वाडकरला सोन्याची अंगुठी देऊन गौरविण्यात आले.

प्रभादेवी समुद्र किनार्‍या जवळील मंडळाच्या पटांगणावर खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात आदर्श मंडळाने पंचगंगा मंडळाचा 40-20 असा सरळ पराभव करीत अंतिम विजेतेपदाचा चषक व रोख सात हजार आपल्या खात्यात जमा केले. उपविजेत्या पंचगंगाला चषक व रोख रु.पाच हजार वर समाधान मानावे लागले. प्रतिस्पर्धी संघाचा अंदाज घेत सावध खेळ करणार्‍या आदर्शकडे पूर्वार्धात 16-11 अशी महत्वपूर्ण आघाडी होती. उत्तरार्धात मात्र टॉप गिअर टाकत आपल्या खेळ गतिमान केला. आणि 20 गुणांच्या मोठ्या फरकाने आपला विजय साजरा केला.

रोशन पाटील यांच्या आक्रमक चढाया त्याला रोशन पाटील, सुशील वाडकर, सौजन्य मोरे यांनी भक्कम बचाव करीत दिलेली मोलाची साथ यामुळे आदर्शने हा सामना आपल्या बाजूने झुकविला. रवींद्र साळुंखे, महेश जाधव, प्राणिल गजये यांनी पूर्वार्धात उत्तम लढत दिली उत्तरार्धात मात्र त्यांचा खेळ ढेपालला. दादोजी कोंडदेव स्पोर्ट्सचा अनिकेत जाधव स्पर्धेतील उत्कृष्ट चढाईचा, तर आदर्शचा करण ठाकूर स्पर्धेतील उत्कृष्ट पकडीचा खेळाडू ठरला. दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी कुलर देऊन गौरविण्यात आले. या अगोदर झालेल्या उपांत्य सामन्यात आदर्शने दादोजी कोंडदेवला 29-26 असे तर पंचगंगाने अमर संदेशला 30-19 असे नमवित अंतिम फेरीत धडक दिली होती. उपांत्य उपविजयी दोन्ही संघांना प्रत्येकी चषक व रोख रु. दोन हजार प्रदान करण्यात आले. या स्पर्धेच्या निमित्ताने मुंबईत विविध ठिकाणी होणार्‍या कबड्डी स्पर्धेला सातत्याने हजेरी लावणार्‍या कबड्डीप्रेमींचा देखील सन्मान करण्यात आला. स्पर्धेचे बक्षीस वितरण माजी नगरसेवक संतोष धुरी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

Exit mobile version