| पोलादपूर | वार्ताहर |
तालुक्यात 22 ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली आहे. या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अर्जामध्ये उमेदवाराचा मतदारयादीतील अनुक्रमांक समाविष्ट करण्याची आवश्यकता आहे. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल करताना संभाव्य उमेदवारांना त्यांचे नावच मतदारयादीतून वगळल्यात आल्याने वर्षानुवर्षे पिढीजात सत्ता उपभोगणाऱ्या राजकीय परिवारांनी प्रशासनाला हाताशी घेऊन केलेल्या राजकीय खेळीचा भाग असल्याची चर्चा तालुक्यात सर्वत्र होऊ लागली आहे. दरम्यान, गोवेले ग्रामपंचायतीमधील एका उमेदवाराने पोलादपूर तहसिल कार्यालयामध्ये मतदारयादीतून नाव वगळण्यात आल्याबद्दल लेखी तक्रार निवडणूक अधिकाऱ्यांकडे दिली आहे.
तालुक्यातील गोवेले ग्रामपंचायतीच्या हद्दीतील विविध विकास कामांबाबतची महिला सरपंचांसोबतची ऑडिओ फोन संभाषणाची क्लीप दोन वर्षांपूर्वी व्हायरल झाली होती. या गोवेले ग्रामपंचायतीमध्ये प्रभाग 1 मध्ये साळवीकोंड गांव, खोपड गाव येथे सर्वसाधारण स्त्री आणि सर्वसाधारण असे आरक्षण आहे तर येथे 174 महिला आणि 188 पुरूष असे एकूण 362 मतदार आहेत. प्रभाग 2 मध्ये सर्वसाधारण स्त्री आणि सर्वसाधारण स्त्री आणि सर्वसाधारण असे आरक्षण असून, 236 स्त्री आणि 268 पुरूष असे एकूण 504 मतदार आहेत. प्रभाग 3 मध्ये अनुसुचित जमाती स्त्री आणि सर्वसाधारण असे आरक्षण असून 175 स्त्री आणि 177 पुरूष असे एकूण 352 मतदार आहेत.
या गोवेले ग्रामपंचायतीमध्ये प्रभाग 1 मधून मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये लक्ष्मी विष्णू साळवी या उमेदवार होत्या. मात्र, यंदा मतदारयादीमध्ये त्यांचे नाव आढळून येत नसल्याने त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नसल्याची जाणीव होताच पंचायत सदस्यांनी निवडणूक विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. तसेच, मतदारयादीमधून ज्या मतदारांची नावे वगळली आहेत, त्यांच्या नावाचा पुन्हा समावेश करण्याची मागणी यावेळी केली आहे.