वेळात खेळला नाही तर रेड कार्ड अन् खेळाडू मैदानाबाहेर
| बार्बाडोस | वृत्तसंस्था |
ट्वेन्टी-20 लीगमध्ये टाइमपास (वेळेत षटके पूर्ण न करणे) हा आता नित्याचाच झाला आहे, पण कॅरेबियन प्रीमियर लीगने यावर जालीम उपाय शोधला आहे. रेड कार्ड दाखवून अंतिम षटकात एक खेळाडू मैदानाबाहेर काढण्याचा नियम ते यंदाच्या लीगमध्ये अवलंबणार आहेत.
निर्धारित असलेल्या वेळेत सामने पूर्ण व्हायला हवेत ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. सामन्यातील पंच आणि संघ मालक यांनीही याचे भान ठेवायला हवे. षटके वेळेत पूर्ण होत नसतील, तर आर्थिक दंड किंवा सीमारेषेवर एक खेळाडू कमी करण्याचे नियम आता पुरेसे नाहीत हे लक्षात आल्यामुळे आम्ही मैदानावरचा एक खेळाडू कमी करण्याचा नवा नियम केला आहे असे हॉल म्हणाले. ट्वेन्टी-20 प्रकाराचा एक महत्त्वाचा नियम आहे, त्यानुसार 85 मिनिटांचा एक डाव असतो. खेळाडूंना मैदानावर होणाऱ्या दुखापती आणि डीआरएस यासाठी लागणारा वेळ यामध्ये मोजला जाणार नाही. कॅरेबियन लीग 17 ऑगस्टपासून सुरू होत आहे आणि ती 31 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
…तर फलंदाजी संघालाही शिक्षा
फलंदाजी करणाऱ्या संघानेही टाइमपास केला तर त्यांनाही शिक्षेला सामोरे जावे लागेल. मैदानावरील फलंदाज जर वेळकाढूपण करत असतील, तर पंच धावसंख्येतून पाच गुणांची कपात करतील.
कसा आहे नियम?
18 वे षटक वेळेत होत नसेल तर एक अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड सर्कलमध्ये आणला जाईल. 19 वे षटकही जर वेळेत होत नसेल, तर आणखी एक खेळाडू म्हणजेच 6 खेळाडू सर्कलमध्ये असतील. 20 वे षटक वेळेत होत नसेल तर रेड कार्ड दाखवून एका खेळाडूला मैदानाबाहेर काढले जाईल. तो खेळाडू कोण असेल हे कर्णधार ठरवेल.