दिवाळीच्या तोंडावरच वरसेमध्ये पेटला कचरा बॉम्ब

नागरिकांच्या म्हणण्याकडे लक्ष दिले जाणार का ?
| रोहा | प्रतिनिधी |
रोहा शहराच्या लगत असणार्‍या वरसे ग्रामपंचायत हद्दीतील घनकचर्‍याच्या समस्येने उग्र रूप धारण केले असून दिवाळीच्या मुहूर्तावर ग्रामपंचायत हद्दीतील कचरा बॉम्बच्या वातीने चांगलाच पेट घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. मागील काही वर्षे वनविभागाच्या अखत्यारीत येणार्‍या जागेवर तसेच सुभाष राजे यांच्या मालकीच्या जागेत ग्रामपंचायतीकडून बिनदिक्कतपणे कचरा टाकण्यात येत असून या ठिकाणाच्या जवळच स्वयंभू शिवमंदीर तसेच स्वाध्याय परिवाराचे प्रणेते परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या वडिलांची समाधी देखील या ठिकाणी आहे. ग्रामपंचायतीमार्फत टाकण्यात येत असलेल्या कचर्‍यामुळे या परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून स्थानिकांनी याला विरोध केला आहे.ज्या जागेवर कचरा टाकण्यात येत आहे सदर जमिनींना वनविभागाच्या तरतुदी लागू असून वनेत्तर कामांना बंदी आहे.यामुळे सामान्य नागरिकांना लहानसहान कारणांवरून वेठीस धरणारा वनविभाग मागील सुमारे पाच वर्ष वनविभागाच्या जागेत कचरा टाकला जात असताना गप्प का असा देखील सवाल उपस्थित होत आहे. ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक नेतृत्वाच्या हम करे सो कायदा या प्रवृत्तीमुळे हा प्रश्‍न गंभीर बनला आहे.

याबाबत संतोष यशवंत पाटील व अन्य चार जणांनी ग्रामपंचायत वरसे,जिल्हाधिकारी रायगड,तहसीलदार रोहा,रेंज फॉरेस्ट ऑफिसर रोहा यांच्याकडे रितसर तक्रार अर्ज दाखल करून हरकत घेतली आहे. वरसे ग्रामपंचायत हद्दीतील सर्व्हे क्रमांक 67/1ब/1व अन्य लगतच्या जागेत सदर कचरा टाकण्यात येत आहे.सदर मिळकतीमध्ये पूर्वी दगड खाण होती.या जमिनीला वन तरतुदी लागून असून त्या लगतची मिळकत 51/2/ए ही तक्रारदार यांची सामायिक मिळकत आहे.तसेच सर्व्हे क्रमांक 50 मध्ये स्वयंभू शिवमंदिर व तलाव आहे.सदर कचर्‍यामुळे तलावाचे पाणी प्रदूषित होत असून पावसाळ्यात कचर्‍याचे दुर्गंधीयुक्त पाणी मंदिराच्या गाभार्‍यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. याच जागेवर घनकचरा विघटन प्रकल्प राबविण्याचे ग्रामपंचायतीचे नियोजन आहे.पण सदर जागा नागरी वस्तीच्या जवळ असल्याने त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका असल्याने सदर प्रकल्प वरसे येथील गट क्रमांक 69 किंवा 26 या ठिकाणी राबविण्यात यावा.अशी मागणी तक्रारदार यांनी केली असून ग्रामपंचायतीने टाकलेल्या कचर्‍यामुळे जागेचे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी तक्रारदार संतोष पाटील व सह अर्जदार यांनी केली आहे.


रोगापेक्षा इलाज भयंकर
याबाबत ग्रामसेवक अशोक गुट्टे यांच्याशी संपर्क साधला असता कचरा कुठे टाकायचा हा मूळ प्रश्‍न आहे.ग्रामपंचायत हद्दीतील मोकळ्या जागेत कचरा टाकून घेण्यासाठी कोणीही तयार होत नाही.घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी ग्रामपंचायतीला 75 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.पण जागेअभावी प्रकल्प होऊ शकत नाही असे सांगितले. पण सदर प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी ग्रामपंचायत हद्दीतील कचरा न उचलता कचर्‍याचे नियोजन ग्रामस्थांनी स्वतःच करावे अशी दवंडी देऊन ग्रामपंचायतीने आपले हात झटकले आहेत.ग्रामपंचायतीचे हे धोरण म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर असेच आहे.अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

कचर्‍याची समस्या शहर तसेच गावांमध्ये दिवसेंदिवस भयानक स्वरूप धारण करत आहे.शासनाच्या वतीने कचरा निर्मूलन करण्यासाठी उपाययोजना व जनजागृती केली जात आहे.पण कचरा आपल्या घराजवळ किंवा गावात कोणालाच नको आहे.सुमारे पंच्याहत्तर लक्ष रुपयांचा निधी घनकचरा व्यवस्थापन प्रोजेक्टसाठी आणताना प्रथम जागेची उपलब्धता करून घेणे आवश्यक होते. पण जागेच्या उपलब्धतेकडे दुर्लक्ष केल्याने वरसे ग्रामपंचायत हद्दीतील सदर प्रकल्प रखडण्याची चिन्हे दिसत आहेत.वन विभागाने देखील सदर जागेवरील कचरा हटविण्यात यावा यासाठी ग्रामपंचायतीला सूचना दिल्याची माहिती मिळाली आहे.

तक्रारदार यांच्या तक्रारीची दखल घेऊन या प्रश्‍नावर मार्ग काढण्यापेक्षा दबावतंत्राचा मार्ग ग्रामपंचायती मधील मोठा राजकीय पुढारी करत असल्याचा आरोप देखील तक्रारदार पाटील यांनी केला असून या प्रश्‍नाच्या सोडवणुकीसाठी जिल्हाधिकारी, तहसीलदार काय भूमिका घेणार तसेच वनविभाग यामध्ये ग्रामपंचायतीवर कारवाई करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.एकूणच या दिवाळीत वरसे ग्रामपंचायतीमधील कचरा बॉम्बची वात जोरदार पेटल्याचे दिसून येत आहे.

Exit mobile version