पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांकडून सभात्याग

। मुंबई । वृत्तसंस्था ।

विधानसभेचं पावसाळी अधिवेशन आजपासून (दि.17) सुरू झाले असून, विधिमंडळ अधिवेशन कामकाजाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित करत सभात्याग केला.

यांना मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा आहे, खातेवाटप करायचं, दिल्लीला जायचं-यायचं. या सगळ्यामध्ये शेतकऱ्यांकडे पूर्ण दुर्लक्ष होत आहे. यामध्ये बोगस बियाणे आणि खते मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये आले आहेत. काही टोळ्या सरकारी टोळ्या असं दाखवून हप्ते वसूल करण्याचा कार्यक्रम राज्यात चालला आहे. सरकार म्हणून शेतकऱ्यांच्या परिस्थीतीकडे लक्ष नाही आहे, असा आरोप बाळासाहेब थोरात यांनी सभागृहात केला. तसेच, त्यांनी आजच या मुद्द्यावर चर्चा झाली पाहीजे. ही गंभीर, तातडीची परिस्थिती आहे. पुढचं कामकाज थांबवून या प्रश्नावर चर्चेला सुरूवात करावी, अशी मागणी बाळासाहेब थोरातांनी केली.

आज राज्यात पावसाच्या स्थितीकडे गांभीर्याने पाहाण्याची गरज आहे. मान्सून उशीरा सुरू झााला आणि राज्यातील 50 टक्क्यापेक्षा जास्त क्षेत्रात पाऊस नाही, पेरण्या 20 टक्केच झाल्या आहेत. पेरण्या झाल्या नाहीत, दुसरे मागील काही महिन्यात अतिवृष्टी, गारपीट यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. यासाठीची मदत, कांद्यासाठी जाहीर केलेलं अनुदान देखील अद्याप मिळालेलं नाही. मुख्यमंत्री आणि पालकमंत्री नगर जिल्ह्यात पारनेर येथे गेले होते. तेथे आठ दिवसात मदत पाठवतो असा दिलेला शब्द त्यांनी पूर्ण केलेला नाही, असेही बाळासाहेब थोरात म्हणाले.

Exit mobile version