| खांब | प्रतिनिधी |
रोहा-कोलाड अंतर्गत राज्य मार्गावर मोकाट गुरांचा मोठ्या प्रमाणावर रस्त्याच्या मधोमध ठिय्या असतो. तसेच, ही मोकाट गुरे रस्त्यावर सैरभैर फिरत असल्याने प्रवासी वर्ग व वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. या प्रकारामुळे स्थानिक ग्रामस्थ व वाहन चालकांसह प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे उनाड गुरे इतरत्र फिरत असताना गुरांचे मालक निवांतपणे घरीच झोपा काढत असल्याचे संतप्त ग्रामस्थांकडून बोलले जात आहे. तसेच, या मोकाट गुरांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडीही निर्माण होताना दिसत आहे. तर, वाहन चालकांच्या घाईगडबीत मोठाले अपघात झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यातच जर दुर्दैवाने एखाद्या गुराचा अपघात झालाच तर मालकवर्ग भरपाई मिळावी म्हणून धावत पळत येतो; परंतु, आपल्या गुरांमुळें एखाद्याला अपघातामध्ये दुखापत झाली तर गुरांचा मालक जवळ सुद्धा फिरकत नसल्याने अनेकदा समोर आले आहे. अशा मोकाट गुरांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी संबंधित प्रशासनाच्या माध्यमातून कडक पावले उचलून योग्य ती कारवाई करण्याची मागणी प्रवासी वर्ग व वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.
रोहा-कोलाड मार्गावर गुरांचा सुळसुळाट
