पुन्हा एकदा बॅगेत आढळला मृतदेह

। कल्याण । प्रतिनिधी ।

कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. कल्याण-नगर रस्त्यावरील वरप गावातील गावदेवी मैदानाशेजारील कचराकुंडीत एका अज्ञात व्यक्तीचा मृतेदह बॅगेत सापडला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यापूर्वीदेखील दादर रेल्वे स्थानकात बॅगमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळला होता.

दादर येथील मृतदेह सापडल्याची घटना ताजी असतानाच अशीच एक धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे. गुरुवारी (दि.15) कल्याण-नगर रस्त्यावरील वरप गावातील गावदेवी मैदानाशेजारील कचराकुंडीजवळ लघुशंका करण्यासाठी गेलेल्या तरुणाला त्याठिकाणी एक बॅग दिसून आली. त्याने ती उघडून पहिली असता त्याला बॅगेत मृतदेह दिसला. त्याने घाबरून याबाबत तात्काळ कल्याण ग्रामीण पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदनासाठी मृतदेह मध्यवर्ती रुग्णालयात पाठवला. अंगाने मध्यम बांधा असलेल्या सावळ्या रंगाच्या या वृद्धाची उंची साधारण 5 फूट 5 इंच इतकी आहे. दरम्यान, ही व्यक्ती कोणाच्या ओळखीची असेल किंवा हरवली असेल तर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन कल्याण पोलिसांनी केले आहे. तसेच, वृद्धाची हत्या कोणी केली याचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही तपासून ही बॅग कोणी टाकली याचा तपास पोलीस करत आहेत.

Exit mobile version