वाहन जप्त करून गुन्हा दाखल
| म्हसळा | प्रतिनिधी |
म्हसळा तालुक्यातून होणाऱ्या अवैध वन उपज वाहतुकीविरोधात वनविभागाने कडक कारवाई केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे वनविभागाच्या पथकाने आंबेत पोलीस ठाण्याजवळ धडक कारवाई करत टाटा कंपनीचे इंट्रा 30 हे वाहन जप्त केले. या वाहनातून अवैधरीत्या खैर वनउपज वाहतूक केली जात असल्याचे उघडकीस आले असून, याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वनविभागाने केलेल्या कारवाईत खैर सोलिव नग 262, ज्याचे एकूण घनफळ 1.003 घनमीटर असून अंदाजे किंमत 10 हजार 598 रुपये आहे. तसेच, खैर सोलिव किटा 1.238 घनमीटर, अंदाजे किंमत 2 हजार 84 रुपये, असा वनउपज साठा आढळून आला. त्यासोबत सुमारे 3 लाख रुपये किमतीचे वाहनही जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी मंडणगड तालुक्यातील अरविंद काते याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई वनविभागाच्या पथकाने केली असून, पुढील तपास वनपरिमंडळ अधिकारी तुळशीदास चावरेकर, मंडणगड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दरम्यान, आंबेत मार्गावरील मंडणगड परिसरातून होणाऱ्या अवैध खैर वाहतुकीला आळा घालण्यासाठी वनविभागामार्फत आंबेत येथे चेकपोस्ट उभारण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वनउपज वाहतुकीवर अधिक प्रभावी देखरेख ठेवणे शक्य होणार आहे






