रस्त्यासाठी दीड कोटींचा निधी; आमदारांचे हस्ते भूमिपूजन

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील शेलू ग्रामपंचायतीमधील शेलू रेल्वे स्थानक ते रेल्वे फाटक या 700 मीटर लांबीच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आ. महेंद्र थोरवे यांच्या हस्ते झाला. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणमधून दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीमधून सिमेंट काँक्रिटीकरण रस्ता आणि सांडपाणी वाहून नेणारी गटारे बांधण्यात येत आहेत.

शेलू या मुंबईला उपनगरीय लोकलचे स्थानक असलेल्या गावातील स्टेशनकडे येणार्‍या रस्त्याचे बांधकाम अनेक वर्षे रखडले होते. त्याबद्दल मागील महिन्यात स्थानिक ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली एमएमआरडीएमध्ये बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर अनेक वर्षे रखडलेल्या रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर करण्यात आला होता.

एमएमआरडीए कडून शेलू रेल्वे स्थानक ते रेल्वे फाटक या 700 मीटर लांबीच्या रस्त्याचे आरसीसी काँक्रिटीकरण आणि 400 मीटर लांबीची गटारे बांधण्याचे काम मंजूर झाले आहे. या कामाचे भूमिपूजन सोमवारी (दि.28) आ. महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी शेलू सरपंच शिवाजी खारीक, आरती भगत, नरेश मसने, नेरळ सरपंच उषा पारध, मानिवली सरपंच तुषार गवळी, दामत सरपंच जबीर नजे, नेरळ उपसरपंच मंगेश म्हसकर, नेरळचे माजी सरपंच जान्हवी साळुंखे, माजी उपसरपंच अंकुश शेळके, केतन पोतदार, तसेच अंकुश दाभणे, किसन शिंदे, उत्तम शेळके, मिलिंद विरले, किशोर घारे आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version