| पोलादपूर | प्रतिनिधी |
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील कशेडी घाटात पावसाळा सुरू झाल्यापासून सततच्या अपघातांमुळे व बंद पडणाऱ्या वाहनांमुळे चर्चेत राहात आहे. कशेडी घाटात दोन दिवसांपूर्वी बंद पडलेला ट्रकला ओव्हरटेक करताना सोमवारी सकाळी हायड्रा क्रेन वाहतूक करणारा ट्रेलर साईडपट्टीवर रुतला. यामुळे कशेडी घाटातील वाहतूक सुमारे दीड तास ठप्प झाली. पोलादपूर तालुक्यातील भोगाव बुद्रुक गावाच्या हद्दीत ही घटना सकाळी 9 वाजता घडली. यामुळे झालेली वाहतूक कोंडी साडेदहा वाजण्याच्या सुमारास दूर करण्यात कशेडी टॅप वाहतूक पोलिसांना यश आले.
दोन दिवसांपूर्वी गोवा दिशेने जाणारा ट्रक (क्रमांक आर जे 04 जी सी 9898) दोन दिवसांपूर्वी तांत्रिक बिघाडामुळे कशेडी घाटामध्ये रस्त्यावर बंद पडला. त्यामुळे याठिकाणी एकेरी वाहतूक सुरू होती तर सोमवारी सकाळी चिपळूण दिशेने जाणारा हायड्रा क्रेन वाहतूक करणारा अवजड ट्रेलर (क्रमांक डी डी 01 पी 9436) बंद पडलेल्या ट्रकच्या उजव्या बाजूने मार्ग काढत असताना रस्त्याकडेच्या साईडपट्टीवर रुतला. एकाच ठिकाणी दोन्ही वाहने कशेडी घाटात रस्त्यावर बंद पडल्याने संपूर्ण रस्ता बंद होऊन दोन्ही बाजूची वाहतूक जवळपास दीड तास ठप्प झाली. वाहन चालक व प्रवासी जनतेचे यामुळे अतोनात हाल झाले.
दरम्यान, कशेडी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस हवालदार रामाकडे, पोलीस नाईक शंकर कुंभार, व चिकणे यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत करण्यासाठी क्रेन पाचारण करून वाहने क्रेंनच्या च्या सहाय्याने बाजूला घेऊन सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास वाहतूक सुरळीत करण्यात कशेडी टॅप पोलिसांना यश आले.